मुंबई | Mumbai
राष्ट्रवादी काँगेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या आकस्मिक निधनामुळे त्यांच्या जागी कुणाची वर्णी लागणार किंवा राजकीय वारसा पुढे कोण चालवणार असा प्रश्न निर्माण झाला होता. त्यानंतर अखेर काल (शुक्रवारी) याचं कोड सुटले असून, अजित पवारांच्या पत्नी राज्यसभेच्या खासदार सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले आहे. त्या आज (शनिवारी) उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. सुनेत्रा पवार यांच्या रूपाने राज्याला पहिल्या उपमुख्यमंत्री मिळणार आहेत.
सुनेत्रा पवार यांना देखील राजकीय वारसा असून, त्या माजी मंत्री पद्मसिंह पाटील (Former Minister Padmasinh Patil) यांच्या बहीण आहेत. १९८५ मध्ये त्यांचा अजित पवार यांच्यासोबत विवाह झाला. लग्न झाल्यानंतर त्यांनी बारामती येथील काटेवाडीतून सामाजिक कार्याला सुरूवात केली. ग्रामस्वच्छता चळवळीची मुहूर्तमेढ त्यांनी काटेवाडीमध्ये रोवली. स्वतः हातात खराटा घेऊन कामाला सुरुवात करणाऱ्या सुनेत्रा पवार यांनी संपूर्ण गावालाच या अभियानात सहभागी केले होते. त्यांच्या या प्रेरणेतून ग्रामस्वच्छता अभियानात काटेवाडी राज्यात प्रथम क्रमांकावर आले. त्यांच्या या कार्याची दखल घेत देश-विदेशातून अभ्यासकांनी काटेवाडीला भेट दिली. या सामाजिक कार्यातूनच सुनेत्रा पवार यांना खऱ्या अर्थाने राजकीय क्षेत्राकडे वाटचाल करण्याची संधी मिळाली.
हे देखील वाचा : Maharashtra Politics : दादांची सावली मंत्रालयात; सुनेत्रा पवार पहिल्या महिला उपमुख्यमंत्री, आज शपथविधी
सुनेत्रा पवार यांचा परिचय
सुनेत्रा पवार यांचा जन्म (१८ ऑक्टोबर १९६३) मराठवाड्यातील धाराशिव जिल्ह्यात झाला. माजी मंत्री आणि शरद पवारांचे जुने स्नेही पद्मसिंह पाटील यांच्या त्या भगिनी आहेत. सुनेत्रा पवार यांना लहानपणापासूनच राजकारण आणि समाजकारणाचा वारसा मिळाला होता. १९८५ मध्ये त्यांचे अजित पवार यांच्याशी लग्न झाले. अजित पवार राजकारणात सक्रिय झाल्यानंतरही सुनेत्रा पवार राजकारणापासून दूर होत्या. बारामतीमध्ये शेती आणि समाजकारणात त्यांचा सहभाग मात्र होता.
हजारो महिलांना मिळवून दिला रोजगार
पर्यावरण आणि स्वच्छतेची आवड असणाऱ्या सुनेत्रा पवारांनी बारामतीमध्ये ‘एन्व्हायर्नमेंटल फोरम ऑफ इंडिया’ ही सामाजिक संस्था स्थापन केली. या संस्थेच्या माध्यमातून त्या मोतीबिंदू शस्त्रक्रिया, वृक्षारोपण, ओढा खोलीकरण, महिलांमध्ये कर्करोगाविषयी जागृती आदी उपक्रम राबवतात. या सर्व उपक्रमांमध्ये त्यांचा सक्रिय आणि नेतृत्वात्मक सहभाग राहिला. बारामती टेक्सटाईल पार्कच्या अध्यक्षपदाच्या माध्यमातून त्यांनी हजारो महिलांना रोजगार मिळवून दिला.
२०२४ च्या लोकसभा निवडणुकीच्या माध्यमातून राजकारणात प्रवेश
राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटीनंतर २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत सुनेत्रा पवार यांचा प्रत्यक्षात राजकारणात प्रवेश झाला. अजित पवारांनी बारामती लोकसभा मतदारसंघातून त्यांना सुप्रिया सुळे यांच्याविरोधात निवडणुकीच्या रिंगणात उतरवले होते. या निवडणुकीत पवार कुटुंब दोन गटांत विभागल्याचे दिसून आले. अजित पवारांचे बंधू श्रीनिवास पवार यांनी बहीण सुप्रिया सुळे यांची साथ दिली होती. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत सुप्रिया सुळे यांना ७.३२ लाख मते मिळाली होती. तर सुनेत्रा पवार यांना ५.७३ लाख मते मिळाली होती. त्यामुळे सुळे यांनी १.५९ लाख मतांनी विजय मिळविला होता.
लोकसभेतील पराभवानंतर राज्यसभेच्या खासदार
लोकसभा निवडणुकीत दारूण पराभव झाल्यानंतर सुनेत्रा पवार यांची प्रफुल्ल पटेल यांच्या रिक्त झालेल्या जागेवर राज्यसभेत वर्णी लागली. १३ जून २०२४ साली त्यांनी राज्यसभेसाठी उमेदवारी अर्ज भरला होता. त्यानंतर त्या राज्यसभेच्या खासदार झाल्या. राज्यसभा खासदार म्हणून काम करत असतानाच त्यांना तालिका अध्यक्षपदाची जबाबदारी मिळाली आणि देशाच्या सर्वोच्च सभागृहाच्या अध्यक्ष आसनावर विराजमान होण्याचा मान मिळाला.
अजित पवारांना दिली खंबीर साथ
सुनेत्रा पवार यांनी लग्न झाल्यानंतर अजित पवारांसोबत शेतकाम, पोल्ट्री व्यवसाय ते गुरेढोरे सांभाळणे, दूध काढणे अशी सर्व कामे केली. त्यांनी अजितदादांच्या राजकीय वाटचालीत आपली घरं सांभाळणे, नातेसंबंध जपणं, सामाजिक कार्य करणं, कठीणप्रसंगी साथ देणं आणि सल्लामसलत करणं, ही जबाबदारी सांभाळली. त्यानंतर आज सुनेत्रा पवार अजितदादांच्या अकाली निधनानंतर राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार आहेत.





