नवी दिल्ली | New Delhi | वृत्तसंस्था
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) हे आज (सोमवारी) हरियाणाच्या (Haryana) दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी हिस्सारमध्ये पहिल्या विमानतळाचे उद्घाटन केले. याठीकाणाहून हिसार-अयोध्या विमान उड्डाणाला हिरवा झेंडा दाखविला. यानंतर त्यांनी विमानतळावर झालेल्या जाहीर सभेला संबोधित करतांना काँग्रेसवर (Congress) जोरदार टीका केली. तसेच, वक्फ कायद्यामुळे काँग्रेसने संविधानाची ऐसीतैसी केल्याचा दावाही मोदींनी केला.
यावेळी बोलतांना पंतप्रधान मोदी म्हणाले की, “काँग्रेसला कुणाचं भलं झालं पाहिजे असं कधीही वाटलेलं नाही. मुस्लिमांचं (Muslims) भलं करावं असंही काँग्रेसला कधीच वाटलेलं नाही. काँग्रेसने कायम मुस्लिमांच्या लांगुलचालनाचं राजकारण केलं. पण त्यामुळे मुस्लिमांचा काहीही फायदा झालेला नाही उलट नुकसान झालं आहे. काँग्रेसने फक्त काही कट्टरपंथीय लोकांना खुश करण्याचा पर्याय निवडला. त्यामुळे इतर समाज हाल अपेष्टाच सहन करत राहिला. अशिक्षित आणि गरीब राहिला. काँग्रेसच्या कुनीतीचं सर्वात मोठं उदाहरण वक्फ कायदा आहे. आता नव्या तरतुदींमळु वक्फच्या पवित्र भावनेचा सन्मान होईल”, असे त्यांनी म्हटले. तसेच माझा काँग्रेसला सवाल आहे जर तुम्हाला मुस्लिमांचा कळवळा आहे तर मग तुमच्या पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी मुस्लिम व्यक्तीला का नेमत नाही? असा प्रश्नही पंतप्रधान नरेंद्र मोदींनी विचारला.
पुढे ते म्हणाले की, “काँग्रेसने देशातील (Country) अनुसूचित जाती, जमाती आणि इतर मागासवर्गीयांना दुय्यम दर्जाचे नागरिक मानले. काँग्रेस नेते स्विमिंग पूलसारख्या सुख-सुविधांचा आनंद घेत होते. मात्र, गावांतील प्रति १०० घरांमागे केवळ १६ घरांनाच पाईपने पाणीपुरवठा होत होता. याचे सर्वाधिक नुकसान एससी, एसटी आणि इतर मागासवर्गीयांनाच झाले. आज जे गल्ल्या-गल्ल्यांत जाऊन भाषणे देत फिरत आहेत. त्यांनी किमान आपल्या अनुसूचित जाती, जमाती आणि इतर मागासवर्गीय बांधवांच्या घरी पाणी तरी पोहोचवायला हवे होते”, असेही मोदींनी म्हटले.
बाबासाहेबांना अपमानित केले
बाबासाहेबांनी सामाजिक न्यायाचं स्वप्न पाहिलं होतं. संविधानात त्यांनी सामाजिक न्यायाची व्यवस्था केली होती. त्यातही खंजीर खुपसून काँग्रेसने संविधानाच्या (Constitution) या तरतुदींना लांगूलचालणाचं माध्यम बनवलं. सत्ता हस्तगत करण्याचं एक हत्यार म्हणून काँग्रेसने संविधानाचा वापर केला. जेव्हा जेव्हा काँग्रेसला सत्तेचं संकट दिसलं तेव्हा तेव्हा त्यांनी संविधान पायदळी तुडवलं. काँग्रेसने आणीबाणीच्या काळात संविधानाच्या आत्म्याला नख लावलं. आपल्याच हाती सत्ता राहावी म्हणून त्यांनी हे केलं. काँग्रेसने बाबासाहेबांना सतत अपमानित केलं. त्यांचे विचार संपुष्टात आणण्याचा प्रयत्न केला, असा आरोपही मोदींनी केला.
गरीबांना फायदा होईल
वक्फच्या नावावर लाखो हेक्टर जमीन आहे. वक्फच्या मालमत्तेचा लाभ गरजवंतांना दिला असता तर त्यांना फायदा झाला असता. पण, या मालमत्तेचा फायदा भू-माफियांना मिळाला. आता या नव्या दुरुस्ती विधेयकामुळे गरीबांची लूट बंद होणार आहे. आता नव्या वक्फ कायद्यामुळे देशातील कानाकोपऱ्याती आदिवासींच्या कोणत्याही जमिनीला ते हात लावू शकणार नाहीत. नव्या तरतुदींमुळे मुस्लिम समाजातील गरीब आणि पसमांदा कुटुंब, महिला आणि खासकरून मुस्लिम विधवा, मुलांना हक्क मिळेल. त्यांचे हक्क सुरक्षित राहतील. हाच खरा न्याय आहे, असेही पंतप्रधान मोदी म्हणाले.
काँग्रेसने धर्माच्या आधारावर आरक्षण दिले
पंतप्रधान मोदी म्हणाले की, “काँग्रेसने डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे काय केले हे आपण कधीही विसरू नये. काँग्रेसने त्यांना दोनदा निवडणुकीत पराभूत करून त्यांचा अपमान केला. काँग्रेस संविधानाचा नाश करणारी बनली आहे. कर्नाटकच्या काँग्रेस सरकारने एससी, एसटी, ओबीसींचे पेन्शनमधील अधिकार हिसकावून घेतले आणि धर्माच्या आधारावर आरक्षण दिले”, असेही त्यांनी म्हटले.