नवी दिल्ली | New Delhi
लोकसभेत आज (सोमवारी) विरोधी पक्षनेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी डोकलाममध्ये चिनी घुसखोरीचा मुद्दा उपस्थित केल्याने चांगलाच गदारोळ झाला. राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील आभार प्रस्तावावरील चर्चेत भाग घेताना राहुल गांधी यांनी आपल्या भाषणाची सुरुवात चिनी रणगाडे भारतात (India) घुसल्याचे सांगितले. त्यावर संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी तीव्र आक्षेप घेतला. त्यानंतर गृहमंत्री अमित शाह यांनी त्यांच्या आसनावरून उभे राहून त्यांचा दावा फेटाळून लावला. यावेळी विरोधक-सत्ताधाऱ्यांमध्ये जोरदार खडाजंगी झाली.
राहुल गांधी यांनी माजी लष्करप्रमुख मनोज नरवणे (Manoj Narwane) यांच्या पुस्तकाचा दाखला देत सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला. यावर सरकारच्यावतीने सभागृहात ‘राहुल गांधी ज्या पुस्तकाच्या आधारे आरोप करत आहेत, ते प्रकाशितच झालेलं नाही, असे सांगण्यात आले.यानंतर राहुल यांनी ‘मला वेळ दिल्याबद्दल सभागृहाचे धन्यवाद’ असं म्हटले. तसेच “काँग्रेसवर (Congress) अनेक आरोप करण्यात आले आहेत, त्यावर मी आता बोलणार नाही. त्याऐवजी मी काही वाचून सुरुवात करतो. माजी लष्करप्रमुख नरवणे यांचं हे पुस्तक आहे. तुम्ही सर्वांनी लक्षपूर्वक ऐका मी काय वाचतो. यावरुन समजेल कोण देशभक्त आहे कोण नाही” असंही ते म्हणाले.
राहुल गांधी यांनी आपल्या भाषणात जेव्हा-जेव्हा नरवणे यांचे नाव घेत होते, तेव्हा-तेव्हा सत्ताधारी पक्षाचे सदस्य आक्षेप घेत होते. यावेळी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह (Rajnath Singh) आपल्या आसनावरून उभे राहत ‘ते पुस्तक तथ्यावर आधारित असतं तर प्रसिद्ध करु दिलं असतं. त्यातली तथ्य चुकीची होती. याच कारणामुळे ते पुस्तक प्रकाशित होत नाही’,असे म्हटले. तसेच अमित शाह देखील अनेक वेळा आपल्या आसनावरून उभे राहिले आणि विरोधी पक्ष सदस्यांना तथ्यांसह बोलण्याचे आवाहन केले.
दरम्यान, या गोंधळावेळी लोकसभेचे सभापती ओम बिर्ला (OM Birla) यांनी नियमांचा हवाला देत सदस्य त्यांच्या भाषणात मासिके किंवा पुस्तकांचा संदर्भ घेऊ शकत नाही असे म्हटले. त्यानंतर राहुल गांधी यांनी पाकिस्तान-चीनचे नाव घ्यायचे नाही का, असा सवाल केला? तुम्हीच सांगा भाषण कसे करायचे? असे ते म्हणाले. दोन्ही बाजूने गदारोळ वाढल्यानंतर लोकसभेचे कामकाज काही वेळासाठी स्थगित करण्यात आले.




