Monday, January 26, 2026
Homeमुख्य बातम्याRaj Thackeray : "बाळासाहेबांनी हिंदूंकडे व्होटबँक म्हणून…"; राज ठाकरेंची काकांच्या स्मृतिदिनानिमित्त सोशल...

Raj Thackeray : “बाळासाहेबांनी हिंदूंकडे व्होटबँक म्हणून…”; राज ठाकरेंची काकांच्या स्मृतिदिनानिमित्त सोशल मीडियावरील पोस्ट चर्चेत

नेमकं काय म्हटलंय?

मुंबई | Mumbai

हिंदुहृदयसम्राट आणि शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांचा आज १३ वा स्मृतिदिन असून, यानिमित्त शिवसेना (उबाठा) प्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी शिवतीर्थावर जाऊन त्यांच्या प्रतिमेला अभिवादन केले. यानंतर आता राज ठाकरेंनी (Raj Thackeray) एक्स प्लॅटफॉर्मवर पोस्ट करून बाळासाहेबांना आदरांजली वाहिली आहे.

- Advertisement -

बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावर अभिवादन केल्यानंतर उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) राज ठाकरे, आदित्य ठाकरे, चंदू मामा, रश्मी ठाकरे एकत्र स्मृतीस्थळी थोडावेळ बसल्याचे बघायला मिळाले. गेल्या अनेक महिन्यात राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे अनेकवेळा एकत्र दिसले. तसेच दिवाळी, भाऊबीजसह अनेक कार्यक्रमात ठाकरे कुटुंबही एकत्र आले होते.

YouTube video player

परंतु राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे ११ वर्षांनंतर दादरमधील (Dadar) बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावर अभिवादन करण्यासाठी एकत्र दिसले. यावेळी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंची काहीवेळ चर्चाही झाली. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंना एकत्र बघता उपस्थित शिवसैनिक भावनिक झाल्याचेही दिसून आले. 

संजय राऊतांनी घेतले बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळाचे दर्शन

ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी प्रकृतीच्या कारणास्तव ३१ ऑक्टोबरपासून घराबाहेर पडणे पूर्णपणे बंद केले होते. मात्र, आज बाळासाहेब ठाकरे यांचा १३ वा स्मृतीदिन असल्याने त्यांना राहावले नाही आणि ते शेवटी बाळासाहेबांच्या स्मारकाचे दर्शन घ्यायला घराबाहेर पडले. शर्ट-पँट अशा पेहरावात ते शिवाजी पार्कवर दाखल झाले. यावेळी संजय राऊत यांच्या तोंडाला संसर्ग टाळण्यासाठी मास्क लावलेला होता.

राज ठाकरेंनी पोस्टमध्ये काय म्हटलंय?

शिवसेना पक्षाचे संस्थापक, हिंदुहृदयसम्राट आणि माझे काका स्व. बाळासाहेब ठाकरे यांची आज पुण्यतिथी. देशाच्या इतिहासात भाषिक अस्मितेच्या जोरावर एक प्रचंड चळवळ निर्माण करून त्यातून एका राजकीय पक्षाला जन्म देणारे बाळासाहेब. आणि पुढे जातीय अस्मिता तीव्र होण्याच्या काळात आणि भारतीय जनता पक्षाचा कमंडलवाद फोफावायच्या आधी हिंदू म्हणून अस्मिता जागी करणारे बाळासाहेबच.

पण म्हणून बाळासाहेबांनी हिंदूंकडे व्होटबँक म्हणून नाही पाहिलं. त्यांच्यासाठी हा विषय अस्मितेचा होता, धर्माप्रतीच्या प्रेमाचा होता. आणि हे करताना बाळासाहेबांनी, प्रबोधनकारांकडून आलेला तर्कवाद पण सोडला नाही. बाळासाहेब हे कमालीचे हिंदुप्रेमी होते, पण म्हणून त्यांच्यातली चिकित्सक वृत्ती लोप पावली नाही. त्यामुळे बाळासाहेबांची प्रतिमा चोरून हिंदुत्वाचे वारस म्हणून मिरवणाऱ्यांची किंवा त्यावर मतं मागणाऱ्यांची गंमत वाटते. ना त्यांना बाळासाहेब माहित आहेत, ना त्यांना प्रबोधनकार माहित आहेत, (अर्थात ऐकणं आणि वाचणं यांचा दुष्काळ असल्यामुळे) त्यामुळे त्यांना बाळासाहेबांच्या विचारांची झालेली मशागत किती समृद्ध होती ह्या पुसटशी देखील कल्पना नाही !

फक्त मतं, सत्ता मिळवणे आणि ती सत्ता मिळाल्यावर वाट्टेल तसं ओरबाडणं म्हणजे राजकारण हे रूढ होत असताना, समाजकारण आधी आणि मग राजकारण हे आमच्या विचारात रुजवणाऱ्या बाळासाहेबांच्या स्मृतीस महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे विनम्र अभिवादन!

ताज्या बातम्या

Ahilyanagar : ‘नियोजन’ च्या 756 कोटी 43 लाखांच्या प्रारूप आराखड्यास मान्यता

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत 2026-27 या आर्थिक वर्षासाठी जिल्हा वार्षिक योजनेच्या 756 कोटी 43 लक्ष रुपयांच्या प्रारूप आराखड्यास मान्यता देण्यात आली आहे....