मुंबई | Mumbai
शिवसेना (उबाठा) पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरेंचा (Uddhav Thackeray) आज (रविवार) ६५ वा वाढदिवस (Birthday) आहे. या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरेंना शुभेच्छा देण्यासाठी राज्यभरातील शिवसैनिक (Shivsainik) त्यांच्या ‘मातोश्री’ या निवासस्थानी दाखल झाले आहेत. याच निमित्ताने मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी अनेक वर्षांनंतर ‘मातोश्री’ या निवासस्थानी दाखल होत उद्धव ठाकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.
यावेळी राज ठाकरे यांनी मातोश्रीवर पोहोचताच पहिल्यांदा उद्धव ठाकरेंच्या हातात हात देत त्यांना पुष्पगुच्छ देऊन वाढदिवसाच्या (Birthday) शुभेच्छा दिल्या. तर उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंच्या खाद्यांवर हात ठेवून आलिंगन दिले. यावेळी शिवसेना ठाकरे गटाचे (Shivsena UBT) अनेक नेते आणि कार्यकर्ते उपस्थित होते. त्यानंतर उद्धव आणि राज हे दोघेही ‘मातोश्री’निवासस्थानाच्या आतमध्ये गेले.
यानंतर राज ठाकरेंनी शिवसेना प्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांना अभिवादन केले. तसेच बाळासाहेब ठाकरे ज्या खुर्चीवर बसायचे, त्या खुर्चीचे राज ठाकरेंनी दर्शन घेतले. यावेळी दोघांमध्ये मातोश्रीत लावलेल्या व्यंगचित्रांबाबत चर्चा झाली. जवळपास २० मिनिटे दोघे ‘मातोश्री’ या निवासस्थानामध्ये होते.
अनेक वर्षांनंतरची मातोश्रीवरील भेट राज ठाकरे यांच्यासाठीही भारावून टाकणारी आणि आठवणींना उजाळा देणारी ठरली. दुसरीकडे राज ठाकरे यांनी सोशल मीडियावरून (Social Media) किंवा फोनद्वारे शुभेच्छा न देता थेट मातोश्रीवर जाऊन बंधू उद्धव ठाकरे यांना वाढदिवसाच्या प्रत्यक्ष शुभेच्छा दिल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
दरम्यान, मराठी विजयी मेळाव्याच्या निमित्ताने काही दिवसांपूर्वी राज आणि उद्धव ठाकरे हे तब्बल १९ वर्षांनंतर एका व्यासपीठावर एकत्र आले होते. त्यानंतर आता वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी राज ठाकरे मातोश्रीवर गेल्याने ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्याला अधिक बळ मिळाले आहे. त्यामुळे आगामी महापालिका निवडणुकीत (NMC Election) दोन्ही पक्ष एकत्र येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.




