Sunday, October 18, 2026
HomeराजकीयPolitical News : शिवसेना शिंदे गटाची उमेदवारीत घराणेशाही; मुंबईसाठी आमदार, खासदारांच्या घरात...

Political News : शिवसेना शिंदे गटाची उमेदवारीत घराणेशाही; मुंबईसाठी आमदार, खासदारांच्या घरात उमेदवारी

मुंबई | प्रतिनिधी | Mumbai

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (DCM Eknath Shinde) यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेने मुंबई महापालिका निवडणुकीसाठी (BMC Election) पक्षातील नेत्यांच्या घरात उमेदवारी दिल्याचे आज (गुरुवारी) समोर आलेल्या यादीवरून स्पष्ट झाले आहे. मुंबईतील आठ आमदार आणि खासदारांच्या कुटुंबात उमेदवारी देताना शिंदे यांनी त्यांना साथ देणाऱ्या माजी नगरसेवकांवर विश्वास टाकला आहे. घराणेशाहीच्या मुद्द्यावरून शिवसेना उद्धव ठाकरे गटावर टीका करणाऱ्या शिंदे यांनी उमेदवारीत घराणेशाहीला प्राधान्य दिले आहे.

- Advertisement -

पक्षाचे माजी खासदार राहुल शेवाळे (Rahul Shewale) यांची भावजय वैशाली नयन शेवाळे यांना प्रभाग क्रमांक १८३ मधून, माजी आमदार सदा सरवणकर यांचा मुलगा समाधान आणि मुलगी प्रिया यांना अनुक्रमे १९४ आणि १९१ मधून उमेदवारी देण्यात आली आहे. कुर्ल्याचे आमदार मंगेश कुडाळकर यांचे चिरंजीव जय कुडाळकर यांना प्रभाग क्रमांक १६९ मधून तिकीट मिळाले आहे. चांदिवली विधानसभा मतदारसंघाचे आमदार दिलीप लांडे यांच्या पत्नी शैला यांना प्रभाग क्रमांक १६३ मधून चेंबूरचे आमदार तुकाराम काते यांनी आपल्या घरात तन्वी काते आणि समृद्धी काते या दोघींना उमेदवारी मिळाली आहे. भांडुपचे आमदार अशोक पाटील यांचा मुलगा प्रशांत पाटील यांना प्रभाग क्रमांक ११३ मधून तिकीट मिळाले आहे. खासदार रवींद्र वायकर यांची कन्या दिप्ती वायकरला प्रभाग क्रमांक ७३ मधून उमेदवारी देण्यात आली आहे.

माजी आमदाराला उमेदवारी

शिंदे गटाने भायखळ्याच्या माजी आमदार यामिनी जाधव यांना मुंबई महापालिका निवडणुकीचे तिकीट दिले आहे. जाधव यांना प्रभाग क्रमांक २०९ मधून उमेदवारी मिळाली आहे. माजी आमदार दिवंगत श्रीकांत सरमळकर यांची सून पल्लवी सरमळकरला प्रभाग क्रमांक ९४ मधून तिकीट मिळाले आहे. याशिवाय माजी नगरसेवक संध्या विपुल दोषी, राजू पेडणेकर, राजुल पटेल, सुवर्णा करंजे, संजय तुरडे, तृप्ती विश्वासराव, अमेय घोळे, अनिल कोकीळ, नाना अंबोले यांना शिंदे गटाने उमेदवारी दिली आहे. तसेच माजी आमदार मंगेश सातमकर, दीपकबाबा हांडे यांच्या घरात उमेदवारी देण्यात आली आहे.

प्रभाग क्रमांक २२५ मध्ये भाजप आणि शिंदे गटाचा उमेदवार

मुंबई महापालिका निवडणुकीत शिवसेना शिंदे गट आणि भाजप यांच्यात युती झाली आहे. त्यानुसार भाजप १३७ तर शिंदे गट ९० जागा लढवत आहे. मात्र, प्रभाग क्रमांक २२५ मध्ये दोन्ही पक्षाच्या उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. या प्रभागात भाजपने विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची भावजय हर्षिता नार्वेकर यांना तर शिंदे गटाने सुजाता सानप यांना उमेदवारी दिली आहे. आज, शुक्रवारी उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शेवटची मुदत आहे. त्यामुळे या प्रभागात युतीचा अधिकृत उमेदवार कोण? हे आज स्पष्ट होईल. भाजप आणि शिंदे गटाच्या उमेदवाराने माघार घेतली नाही तर येथे युतीत मैत्रीपूर्ण लढत होईल.

ताज्या बातम्या

कोलकाता शहरात दुर्गापूजेदरम्यान चेंगराचेंगरी; १७ जणांचा मृत्यू, अनेक जखमी

0
कोलकाता पश्चिम बंगालमधील कोलकाता शहरात दुर्गापूजेच्या उत्सवादरम्यान शनिवारी (१७ ऑक्टोबर) मोठी दुर्घटना घडली. उत्तर कोलकात्यातील चोरबागान सार्वजनिक दुर्गापूजा मंडपात झालेल्या चेंगराचेंगरीत किमान १७ जणांचा...