मुंबई | Mumbai
गेल्या काही वर्षांपासून रखडलेल्या राज्यातील २९ महापालिकांच्या निवडणुकीचा (NMC Election) निवडणूक कार्यक्रम राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे (Dinesh Waghmare) यांनी जाहीर केला. आज (सोमवार) सह्याद्री अतिथीगृह येथे पत्रकार परिषद घेऊन वाघमारे यांनी महापालिका निवडणुकांची घोषणा केली. त्यामुळे आजपासून राज्यात आचारसंहिता लागू झाली आहे.
यावेळी निवडणूक आयुक्त वाघमारे म्हणाले की, ३१ जानेवारी पूर्वी मुदत संपलेल्या महापालिकांच्या निवडणुका घेण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले होते. आज २९ महापालिकांच्या निवडणुकी संदर्भात आजची पत्रकार परिषद आहे. राज्यातील २७ महापालिकांची मुदत संपली असून, जालना आणि इचलकरंजी या नवीन महापालिका आहेत. महापालिका निवडणुकीसाठी नामनिर्देशनपत्र ऑफलाईन स्वीकारण्यात येणार आहेत, असे त्यांनी म्हटले.
ते पुढे म्हणाले, उमेदवारांना सहा महिन्यात जात प्रमाणपत्र सादर करणे अनिवार्य असणार आहे. या निवडणुकीसाठी एकूण मतदार ३ कोटी ४८ लाख १७ हजार इतके असणार आहेत. ३९ हजार १४७ मतदान केंद्र निश्चित करण्यात आले आहेत. यात मुंबई महापालिकेसाठी १० हजार १११ मतदार केंद्र असणार आहे. तसेच या निवडणुकीसाठी १ जुलै २०२५ रोजीची मतदार यादी वापरली जाणार आहे. तर दुबार मतदारांसमोर डबल स्टार केलेला आहे, असे त्यांनी सांगितले.
पुढे ते म्हणाले, २९ महापालिकांच्या २ हजार ८६९ जागांसाठी निवडणूक होणार आहे. यात १ हजार ४४२ महिला असून अनुसूचित जाती ३४१, अनुसूचित जमाती ३७७ आणि नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी ७५९ जागा राखीव आहेत . या निवडणुकीसाठी २३ डिसेंबर ते ३० डिसेंबरपर्यंत उमेदवारांना उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहे. तर उमेदवारी अर्जाची छाननी ३१ डिसेंबर २०२५ रोजी होणार आहे. तसेच उमेदवारांना उमेदवारी अर्ज ०२ जानेवारी २०२६ पर्यंत मागे घेता येणार आहे. तर मतदान १५ जानेवारीला होणार असून, मतमोजणी १६ जानेवारी २०२६ रोजी होईल, असेही दिनेश वाघमारे यांनी सांगितले.
निवडणूक कार्यक्रम
अर्ज भरण्याची तारीख – २३ डिसेंबर ते ३० डिसेंबर २०२५
अर्ज छाननीची तारीख – ३१ डिसेंबर २०२५
अर्ज मागे घेण्याची तारीख – ०२ जानेवारी २०२६
निवडणूक चिन्ह वाटप, अंतिम उमेदवार यादी – ०३ जानेवारी २०२६
मतदानाची तारीख – १५ जानेवारी २०२६
मतमोजणीची तारीख – १६ जानेवारी २०२६
या महानगरपालिकांच्या होणार निवडणुका
१) अहिल्यानगर महानगरपालिका २) अकोला महानगरपालिका ३) अमरावती महानगरपालिका ४) भिवंडी निजामपूर महानगरपालिका ५) बृहन्मुंबई महानगरपालिका ६) चंद्रपूर महानगरपालिका ७) छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका
८) धुळे महानगरपालिका ९) इचलकरंजी महानगरपालिका १०) जळगाव महानगरपालिका ११) जालना महानगरपालिका
१२) कल्याण डोंबिवली महानगरपालिका १३) कोल्हापूर महानगरपालिका १४) लातूर महानगरपालिका १५) मालेगाव महानगरपालिका १६) मीरा भाईंदर महानगरपालिका १७) नागपूर महानगरपालिका १८) नांदेड वाघाळा महानगरपालिका
१९) नाशिक महानगरपालिका २०) नवी मुंबई महानगरपालिका २१) पनवेल महानगरपालिका २२) परभणी महानगरपालिका २३) पिंपरी चिंचवड महानगरपालिका २४) पुणे महानगरपालिका २५) सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका २६) सोलापूर महानगरपालिका २७) ठाणे महानगरपालिका २८) उल्हासनगर महानगरपालिका
२९) वसई-विरार महानगरपालिका





