मुंबई | Mumbai
राज्यातील २८८ नगरपंचायत, नगरपालिकांसाठी आजपासून (सोमवारी) उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात झाली आहे. तर ०२ डिसेंबरला मतदान आणि ०३ डिसेंबरला मतमोजणी होणार आहे. त्याआधी या निवडणुकीसाठी (Election) महायुती आणि महाविकास आघाडीकडून (Mahavikas Aaghadi) मोर्चेबांधणी सुरु झाली आहे. दुसरीकडे गेल्या काही दिवसांपासून ठाकरे बंधूंच्या भेटी गाठी वाढल्याने हे दोघेही एकत्र येणार असल्याचे दिसून येत आहे. मात्र काँग्रेसने (Congress) मनसेला महाविकास आघाडीत सहभागी करून घेण्यास विरोध दर्शविल्याचे बघायला मिळत आहे. अशातच आता काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी ‘एक ला चलो’ चा नारा दिला असून, काँग्रेस स्वबळावर निवडणूक लढवणार, असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
यावेळी ते म्हणाले, मुंबईत अनेक महत्त्वाच्या जागांवर काँग्रेसची ताकद आहे. हायकमांडसोबत चर्चा झाल्यावर आम्ही स्थानिक पातळीवर (Local Level) स्वतंत्र लढण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे कोणाला किती जागा? हा प्रश्न निर्माण होत नाही.मतांचे विभाजन होईल असं मला वाटत नाही. आम्ही मुंबईत लढत आलो आहोत. आमच्या नेहमी ३० ते ३५ जागा निवडून येत असतात. महायुतीचे तीन पक्ष वेगळे लढत असून, त्यांचे विभाजन होत नाही. मग आमच्या विभाजनाची चिंता कशाला? असा सवाल वडेट्टीवार यांनी उपस्थित केला.
पुढे ते म्हणाले, मुंबईत विषय खूप असून, तिजोरी खाली झाली. भ्रष्टाचार खूप झाला आहे, मुंबईच्या एकूण विकासाला छेद देणारे प्रकार मागच्या सरकारमध्ये झाले आहेत. मुंबईत अजूनही पाणी तुंबत आहे. समविचारी पक्षांचा प्रस्ताव आल्यास आम्ही विचार करु. ही कार्यकर्त्यांची निवडणूक (Election) आहे. त्यांना संधी मिळाली पाहिजे. निवडून येण्याचे निकष हा घटक आमच्यासाठी दुय्यम आहे. त्यांना निवडणूक लढण्याची संधी मिळेल. जिंकणं हा आमचा उद्देश नाही पण कार्यकर्त्यांना न्याय देणे उद्देश आहे, असेही देखील विजय वडेट्टीवार यांनी म्हटले आहे.




