अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
मतदान केंद्राच्या बाहेर 200 मीटर त्रिज्येमध्ये उमेदवारांचे निवडणूक बूथ उभारण्यात येऊ नयेत असे निर्देश जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी दिले आहेत. मतदान केंद्राच्या बाहेर 200 मीटर त्रिज्येमध्ये उमेदवारांचे निवडणूक बूथ उभारण्यात येऊ नयेत. एकाच इमारतीत किंवा आवारामध्ये अनेक मतदान केंद्रे असल्यास अशा सर्व मतदान केंद्राकरिता मिळून केवळ एक निवडणूक बूथ प्रत्येक उमेदवाराकरिता 200 मीटर त्रिज्येच्या बाहेर उभारता येईल. प्रत्येक निवडणूक बूथवर केवळ 1 टेबल व 2 खुर्चा तसेच 10 बाय 10 फूट पेक्षा मोठा मंडप नसेल असा छोटा तंबू उभारता येईल.
निवडणूक बूथ उभारण्याकरिता निवडणूक निर्णय अधिकारी, आवश्यकतेनुसार शासकीय प्राधिकरणे तसेच स्थानिक प्राधिकरणे यांच्या परवानग्या घेणे आवश्यक राहील. निवडणूक बूथ उभारल्यामुळे सार्वजनिक किंवा खाजगी मालमत्तेचे अतिक्रमण होणार नाही, याची दक्षता घ्यावी आणि बूथ धार्मिक जागेमध्ये किंवा परिसरात उभारण्यात येऊ नये. निवडणूक बूथ शैक्षणिक संस्था किंवा रुग्णालयाच्या परिसरात उभारण्यात येऊ नये. अशा निवडणूक बूथवर पक्षाचा ध्वज आणि पक्षाचे चिन्ह लावता येणार नाही. निवडणूक बूथचा वापर मतदारांना केवळ अशासकीय मतदार माहिती चिठ्ठ्या देण्याच्या कारणास्तव करता येईल. मतदार माहिती चिठ्यांवर राजकीय पक्षाचे नाव तसेच उमेदवाराचे चिन्ह असू नये. निवडणूक बूथवर उपस्थित व्यक्तींकडून मतदानाकरिता येणार्या मतदारांना कोणताही अडथळा किंवा प्रभाव होणार नाही, याची काळजी घेणे आवश्यक आहे. मतदान केंद्रापासून 200 मि. परिसरात कोणताही प्रचार अनुज्ञेय नाही.
निवडणूक आयोगाने नियुक्त केलेले निवडणूक निरीक्षक तसेच निवडणूकीसाठी प्राधिकृत निवडणूक/पोलीस कर्मचारी वगळता कोणत्याही व्यक्तीस मतदान केंद्राच्या 100 मीटर परिघामध्ये तसेच मतदान केंद्रामध्ये मोबाईल फोन, वायरलेस सेट नेण्यास प्रतिबंध आहे. गुन्हेगारी घटनेशी संबंधित व्यक्तींना निवडणूक बूथवर नियुक्त केले जाणार नाही, याबाबतची दक्षता राजकीय पक्ष आणि उमेदवाराने घेणे आवश्यक आहे. लोकप्रतिनिधीत्व अधिनियम, 1951 च्या कलम 134 (ब) नुसार या कलमाद्वारे परवानगी दिलेल्या व्यक्ती व्यतिरिक्त अन्य कोणत्याही व्यक्तीस मतदान केंद्रामध्ये किंवा त्या परिसरात शस्त्र घेऊन जाण्यास किंवा शस्त्र दाखविण्यास प्रतिबंध आहे, असे जिल्हा निवडणूक प्रशासनातर्फे कळविण्यात आले आहे.