अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
मतदान केंद्र परिसरात मतदारांना पैसे वाटप वा मतदानापूर्वीच बोटाला शाई लावण्याच्या प्रकारांवर कारवाई तसेच केंद्र परिसरात झालेली गर्दी, वाहतूक कोंडी व त्यासाठीच्या नियोजनासाठी मतदान केंद्रांवर ड्रोन कॅमेरांचा वॉच असणार आहे. दरम्यान ज्यांचे जिल्ह्याच्या कोणत्याही मतदारसंघात मतदान नाही, अशांनी जिल्हा बाहेर जाण्याचे आवाहन प्रशासनाद्वारे करण्यात आले आहे. यासाठी येत्या दोन दिवसात जिल्ह्यातील लॉज, ढाबे व हॉटेलची विशेष तपासणी मोहीम राबवली जाणार आहे. या तपासणीत मतदार नसल्याचे कोणी आढळले तर त्यांच्यावर कारवाई केली जाणार आहे.
जिल्ह्यातील बारा विधानसभा मतदारसंघांत बुधवारी 20 नोव्हेंबरला मतदान प्रक्रिया होणार आहे. जिल्ह्यातील तीन हजार 765 मतदान केंद्रांवर मतदान प्रक्रिया शांततेत व सुरळीत पार पाडण्यासाठी जिल्हा प्रशासन सज्ज आहे.पुरेसा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे 21 हजार 574 अधिकारी व कर्मचारी नियुक्त करण्यात आले असून मतदारांनी निर्धोकपणे मतदानाचा हक्क बजावावा, असे आवाहन जिल्हाधिकारी सिद्धराम सालीमठ व पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी केले आहे. सर्व मतदान केंद्रांवर आवश्यक त्या सर्व सोयी सुविधा, स्त्री पुरुषांसाठी स्वतंत्र रांग, रांगेत गर्दी झाल्यास बसण्यासाठी बेंचेस, खुर्च्या, प्रतीक्षालय, पिण्याचे पाणी, स्वच्छतागृह, वैद्यकीय सुविधा, गरोदर महिला, वयोवृद्ध व दिव्यांगांसाठी मतदान प्राधान्य व आवश्यक विशेष सुविधा देण्यात आले आहेत. 99 टक्क्याच्या वर मतदारांपर्यंत मतदार स्लिपा वाटप झालेले आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.
4 हजार जणांवर प्रतिबंधक कारवाई
जिल्ह्यातील 4 हजार 200 जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे. जिल्ह्या तून 278 जणांना हद्दपार केले गेले आहे. त्यांनी मतदानासाठी अर्ज केला तर सकाळी तीन तासांसाठी त्यांना तशी सवलत दिली जाणार आहे. मात्र आतापर्यंत कोणाचाही असा अर्ज आलेला नाही. याशिवाय हिस्ट्री सीटर, फरार व हद्दपार गुंडांची विशेष शोध मोहीम सुरू करण्यात आली आहे. आतापर्यंत जिल्ह्यात 31 कोटी 19 लाख रुपये किमतीची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे. यात सव्वा कोटींची रोख रक्कम तसेच दारू, मौल्यवान वस्तू, अमली पदार्थ आदींचा समावेश आहे. आर्म अॅक्ट नुसार 26 फायर फार्म व 43 शार्प वेपन जप्त करण्यात आले आहेत तसेच 2हजार 352 अग्नी शस्त्रे जमा करून घेण्यात आली आहेत. खर्चाच्या बाबत संवेदनशील असलेल्या संगमनेर व अहमदनगर मतदारसंघांमध्ये विशेष पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
आचारसंहिता भंगाच्या 217 तक्रारी आल्या होत्या त्यांचा अवघ्या 32 मिनिटात निपटारा करण्यात आला आहे. याशिवाय ई-मेल, फोन व प्रत्यक्षपणे करण्यात आलेल्या 33 तक्रारींचाही निपटारा झाला आहे. यात विनापरवाना बॅनर्स व झेंडे वापरणे, खाजगी संस्थांचे कर्मचारी प्रचारात सहभागी होणे, परवानगी न घेता वाहनावर उमेदवाराचा फोटो लावणे, विनापरवाना प्रचार कार्यालय, भाषणातील वक्तव्य, प्रचारासाठी धार्मिक स्थळाचा वापर अशा तक्रारींचा समावेश आहे. पोलिसांनी आचारसंहिता भंगा बाबत आत्तापर्यंत बारा गुन्हे दाखल केले आहेत.
36 आदर्श केंद्रे
जिल्ह्यातील सर्व 12 मतदार संघातील प्रत्येकी तीन मतदान केंद्र आदर्श केंद्रे करण्यात आली आहेत. यात महिला संचलित मतदान केंद्र, दिव्यांग संचलित मतदान केंद्र व युवक संचलित मतदान केंद्र प्रत्येकी एक आहे. याशिवाय मुस्लिम बहुल मतदार असलेल्या 149 मतदान केंद्रांवर पडदामशीन मतदान केंद्र करण्यात आले आहे. जिल्ह्यातील 2 हजार85 मतदान केंद्रांवर वेब कास्टिंग करण्यात येणार आहे. 75 टक्के पेक्षा जास्त मतदान उद्दिष्ट प्रशासनाचे आहे. त्यामुळे जिल्ह्यातील ज्या मतदान केंद्रावर सर्वोच्च मतदान होईल, त्या गावाला विशेष प्रशस्तीपत्र व ट्रॉफी देण्यात येणार आहे तसेच ज्या महाविद्यालयातील नवीन मतदारांपैकी ज्यांचे शंभर टक्के मतदान होईल, त्या महाविद्यालयालाही गौरवले जाणार आहे. आतापर्यंत 85 वर्षावरील 2 हजार 173 व 340 दिव्यांगांचे गृह मतदान झाले आहे. कर्मचार्यांपैकी 14 हजार 278, अत्यावश्यक सेवेतील 56 व सैनिक मतदारांपैकी 322 जणांचे मतदान झाले आहे.
आचारसंहिता काळात 31 कोटींचा मुद्देमाला पकडला
जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्यापासून 31 कोटी 19 लाख रुपयांचा मुद्देमाल पकडण्यात आला आहे. यात रोख रक्कम 1 कोटी 28 लाख, 2 लाख 37 हजार 890 लिटर मद्य पकडले असून त्याची किंमत 3 कोटी 63 लाख रुपये आहे. 53 लाख 19 हजारांची अंमली पदार्थ, 23 कोटी 61 कोटीची मैल्यावन वस्तू यात सोने, चांदीचे दागिणे आणि भेट वस्तू 2 कोटी 18 लाख रुपयांच्या पकडलेल्या आहेत.
त्यांच्यावर होणार कारवाई
जिल्ह्यातील कोणत्याही मतदारसंघात मतदार म्हणून नाव नसलेले व प्रचारा निमित्त जिल्हाबाहेरून आलेल्यांनी निघून जाण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे. अशांचा शोध घेण्यासाठी जिल्ह्यातील लॉजेस, ढाबे व हॉटेल्स यांची विशेष तपासणी मोहीम सुरू करण्यात आली आहे. त्यात आढळणार्या अशा व्यक्तींवर कायदेशीर कारवाई केली जाणार आहे. मतदान केंद्रांवर झालेली गर्दी, केंद्राच्या परिसरात झालेली वाहतूक कोंडी तसेच पैसे वाटप व बोटाला शाई लावण्याचे व अन्य अनुचित प्रकार रोखण्यासाठी मतदान केंद्र परिसरात ड्रोन कॅमेराद्वारे निगराणी सुरू राहणार आहे.