Monday, November 25, 2024
Homeब्लॉगबहुरूपी

बहुरूपी

मराठी मुलखाला लोककलांचा समृद्ध वारसा आहे खरा, पण कालौघात त्यातील अनेक कला लोप पावत चालल्या आहेत. त्या लोककलांची आणि ती पुढे नेणार्‍या अनोख्या परंपरांची ओळख करून देणारे नवे कोरे सदर..

मुले जत्रेत जात असताना त्यांच्या कानावर आवाज आला.

बिन पगारी फुल अधिकारी

- Advertisement -

दंगल पेटली की चालला घरी

वन टू का फोर हाफ डेचा जोर

भाजीची मारामारी

लाडूला फाशी, जिलबीला अटक

काही अडचण आली तर मला संपर्क करा

माझा नंबर लक्षात ठेवा

अखेरला सतरा डेक्कनला उतरा

हे सर्व ऐकून मुलांना हसू आवरता आवरेना. ते म्हणाले, बाबा, हे काय आहे? संजय मुलांना सांगू लागला महाराष्ट्रातील लोककलाकारांपैकी हे एक होते. पूर्वीच्या काळी जेव्हा गाव रस्त्यावर करमणुकीचे पर्याय मर्यादित होते तेव्हा शेकडो मैल पायी फिरून आपली कला सादर करत होते. हे लोककलाकार दुचाकीने चार-सहा गावे एकाच दिवसात पूर्ण करत. हे कलाकार कोणाची तरी हुबेहुब नक्कल करून लोकांना रिझवत असत. त्यांना ‘बहुरूपी’ असे संबोधले जाते. पूर्वी हे ‘बहुरूपी’ अधिक प्रमाणात होते. आता मात्र त्यांची संख्या अतिशय अल्प आहे. हे बहुरूपी प्रामुख्याने फौजदार, हनुमान, शंकर बनून फिरत होते. ती रुपे पाहून गावातली लोक त्यांना धान्य, पैसे वगैरे देत होते. कधी पोलीस निरीक्षकाच्या वेशात तर कधी पोलीस हवालदाराच्या भूमिकेत ते शिरायचे. कधी ज्योतिषी बनून लोकांचे भविष्य बघायचे. कधी राधा गवळण, कधी पाठीवर बसलेली म्हातारी, नकटी राक्षस, तर कधी शिपाई तर कधी पोस्टमन होत होते. पण कधीच कोणाची माय माऊली त्यांना उलट बोलत नव्हती. या लोककलाकारांची शिकवणच होती बेईमानी, चोरी ते कधीच करत नव्हते. ते फक्त मनोरंजन करत होते.

आजही अल्प प्रमाणात असणार्‍या बहुरूपींमध्ये दिसून येते. पोट दुखेपर्यंत लोकांना हसवणे, स्वतःची दुःख बाजूला ठेवून ते समाजाला हसवत होते. बहुतेक वेळी हे कलाकार आपली कला शहरांमध्ये दाखवताना दिसत होते. महाराष्ट्राखेरीज भारताच्या अन्य भागातही बहुरूपी होते. मुलांनी संजयला विचारले, हे असेच हसवणारे बहुरूपी इतर भागातही होते? संजय म्हणाला हो होते. आणि थोड्याफार प्रमाणात आजही आहेत. पंजाब, गुजरातमधील ‘भवय्ये’ म्हणजे ‘बहुरूपी’. बहुरूपी पशुपक्षांचे हुबेहूब ध्वनी काढण्यात तरबेज होते. बहुरूप्यांची कला काही घराण्यांत पितृपरंपरेने चालत आलेली आहे. यांचे अजून एक वैशिष्ट्य. पूर्वी फार चालत होते. लग्नाचे आमंत्रण ते विशिष्ट पद्धतीने द्यायचे. श्रद्धा म्हणाली, म्हणजे? संजय म्हणाला, गाण्यातून ते आमंत्रण करत असे.

लग्नाला चला तुम्ही लग्नाला चला

उंदराची गाडी त्याला मांजराची जोडी

इतभर गाडी त्यात खंडीभर गडी

अशा प्रकारच्या गाण्यातून ते लग्नाचे आमंत्रण देत होते.

बहुरुपी लोकांचे मनोरंजन करण्यासाठी लोकांना आवडतील अशी सोंगे घेत. तसा अभिनय करण्याचा प्रयत्न करत. कधीकधी तर इतकी गंमत होत असे की लोक फसत. पण तरीही ते बहुरुप्यावर खुश होत आणि त्याला बिदागी देत.

राजेशाही काळात बहुरूप्याला राजश्रय प्राप्त होता. बहुरूपी यांचा इतिहास किती मोठा आहे? तर अगदी श्रीपती भट्टांच्या ज्योतिषी रत्नमाला या मराठी ग्रंथात, लीळाचरित्र, ज्ञानेश्वरी, संत तुकोबांच्या अभंगात, समर्थ रामदास व संत एकनाथांच्या भारुडातही बहुरुप्यांचा उल्लेख आढळतो, समर्थ रामदास स्वामींच्या एका भारुडात परमेश्वर हाच बहुरूपी असल्याची कल्पनादेखील मांडली आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांनी बहुरूपी समाजाचा अतिशय चपखल वापर करून घेतला. शत्रूच्या गोटातील बित्तंबातमी काढण्यासाठी शिवराय याच बहुरूपींना शत्रूच्या प्रदेशात पाठवत आणि त्यांनी आणलेल्या खबरींच्या सहाय्याने पुढचे बेत आखत असत. बिरबल आणि बादशहाच्या गोष्टीत हा बहुरूपी भेटत होता. बादशहाच्या दरबारातील बहुरुप्यांच्या बैल, वाघ, घोडा यासारख्या प्राण्यांच्या सोंगांच्या काही आख्यायिका रूढ आहेत. याचा अर्थ मुलांनो, ‘बहुरूपी’ हा महाराष्ट्रीयन लोक कलाकार फार पूर्वीपासून आहे.

परंतु आता चित्रपटगृह आणि करमणुकीची साधने वाढल्याने नवीन पिढीला या गोष्टीची माहिती नसल्याने याही लोककला अस्तंगत होत आहेत. बहुरूपी ही समाजाला हसवत ठेवणारी लोककला टिकली पाहिजे, यासाठी या ‘बहुरूपी’ कलाकारांना समाजाने मदत केली पाहिजे.

आधुनिक काळात लोकाश्रयाच्या व सामाजिक प्रतिष्ठेच्या अभावामुळे ही परंपरा लुप्त होत चालल्याचे दिसून येते. परंपरागत व्यवसायात अनेक अडचणी आल्याने अनेक बहुरूपी या क्षेत्रातून बाहेर पडून अन्य व्यवसायात स्थिरावले आहेत. नवी पिढी अनेक करमणूक साधने अनुभवत असल्यामुळे हल्ली बहुरूप्यांची ओळख राहिली नाही. गावागावांत हिंडणारा हा लोककलाकार आज उपेक्षित आहे. आपणच पुन्हा या लोककलाकारांना उदयास आणले पाहिजे. मुलांनो, असा आहे हा ‘बहुरूपी’. शहरातही अधूनमधून पूर्वी बहुरुपी दिसायचे. कधी पोलीसाच्या वेशात तर कधी देवाच्या वेशात. आता त्यांचे दिसणेही दूुर्मिळच झाले आहे.

चला बघू या आता मुलांना गावाकडच्या जत्रेत पुढे कोणता कलाकार भेटतो तो.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या