दिल्ली | Mumbai
दाक्षिणात्य सिनेसृष्टीसाठी आणखी एक दुःखद बातमी आहे. तामिळमधील प्रसिद्ध विनोदवीर मायिलसामी यांचे निधन झाले आहे. टॉलिवूडमधील अभिनेते आणि नेते नंदामुरी तारक रत्न यांच्या निधनानंतर आणखी एका अभिनेत्याच्या निधनाने दाक्षिणात्य चित्रपट सृष्टीवर शोककळा पसरली आहे.
ट्रेड अॅनालिस्ट रमेश बाला यांनी ट्विटरवर मायिलसामी यांच्या निधनाची बातमी दिली. मायिलसामी यांना काही ठीक वाटत नव्हते त्यानंतर कुटुंबानं त्यांना लगेचच रुग्णालयात घेऊन गेले. मात्र, तेथे पोहचण्यात त्यांना उशिर झाला आणि मायिलसामी यांना डॉक्टरांनी मृत घोषित केले.
मायिलसामी यांच्या करिअरविषयी बोलायचे झाले तर त्यांनी आता पर्यंत 200 पेक्षा जास्त चित्रपटांमध्ये काम केले आहे. कंचना (2011), वेदालम (2015), गिल्ली (2004), वीरम (2014), कंचना-2 (2015), कसू मेला कसू (2018) या सारख्या अनेक चित्रपटांमध्ये भूमिका साकारल्या आहेत.
मायिलसामी यांनी विरुगंबक्कम मतदारसंघातून अपक्ष उमेदवार म्हणून 2021 ची विधानसभा लढवली होती. मायिलसामी हे केवळ विनोदी कलाकारच नव्हते, तर त्यांनी अनेक अप्रतिम भूमिकाही साकारल्या आहेत. मायिलसामी यांनी चित्रपटांव्यतिरिक्त टीव्ही शो देखील केले. त्यांनी Lollupa चे सुत्रसंचालन देखील केले होते.