मुंबई
राज्यातील जिल्ह्यातील पालक मंत्री पदाची यादी काल शनिवारी दि.१८ रोजी जाहीर करण्यात आली होती मात्र, त्याच्याच दुसऱ्या दिवशी सामान्य प्रशासन महाराष्ट्र राज्य यांच्या मार्फत एक जीआर जारी करत रायगड आणि नाशिक जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदाच्या निर्णयाला सरकारने स्थगिती दिल्याचे समजले.
हा जीआर क्रमांक २०२५०११९२०५३२५५७०७ च्या नुसार सामान्य प्रशासन विभागाच्या मार्फत नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्री पदाला स्थगिती देण्यात आली.
हा जीआर रात्री उशीरा समाज माध्यमांवर फिरल्याने चर्चेला उधाण आले.मात्र, महाराष्ट्र शासनाच्या संकेतस्थळावर हा जीआर दिसत असल्याने त्या बाबतची खातर जमा झाली.
शनिवारी राज्याच्या पालकमंत्री पदाच्या याद्या जाहीर झाल्या. मात्र या बाबत रविवारी शिर्डीत राष्टवादी काँग्रेसच्या अधिवेशनात या नियुक्त्यांबाबत पदाधिकाऱ्यांमध्ये चर्चा होती. मुख्यमंत्री स्वित्झर्लंड (दावोस) दौऱ्यावर असताना या घडामोडी झाल्याचे समजते. आदिती तटकरे यांना रायगडचे पालकमंत्रीपद देण्यात आल्या नंतर भरत गोगावले यांचे कडून नाराजी व्यक्त करण्यात आली होती. त्यांनी ती तशी राष्ट्रवादीच्या अधिवेशनात बोलून दाखविली. रायगड मध्ये देखील पदाधिकाऱ्यांनी तटकरे यांच्या नियुक्तीला विरोध केला होता.
नाशिक मध्ये तीन मंत्री असताना अपेक्षे नुसार नाशिकचे पालकमंत्री पद गिरीश महाजन यांना देण्यात आले होते. येत्या कुंभमेळ्याचा काळ लक्षात घेता नाशिक मध्ये भाजपाचा एकही मंत्री नसल्याने महाजन यांची वर्णी नाशिकच्या पालकमंत्रीपदी लागल्याची चर्चा होती.
नाशिक मधील तीन मंत्र्यांपैकी माणिकराव कोकाटे यांना नंदुरबारचे पालकमंत्री व नरहरी झिरवाळ यांना हिंगोली चे पालकमंत्री पद देण्यात आले आहे. हे दोघे ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाचे आमदार आहेत. नाशिक जिल्ह्याचे तिसरे मंत्री दादा भुसे शिवसेना एकनाथ शिंदे गट हे मागील सरकार मध्ये नाशिकचे पालक मंत्री होते.मात्र, ह्या वेळेस त्यांना पालकमंत्री पदाची जवाबदारी देण्यात आली नव्हती. या बाबत त्यांनी समाज माध्यमांना प्रतिक्रिया देताना दादा भुसे म्हणाले की सरकार मधील तीनही पक्षांच्या जेष्ठ नेत्यांनी पालक मंत्री पदाचे निर्णय घेतले आहेत. मला जी जवाब दारी माझ्या पक्षाने दिली ती मी कार्यकर्ता म्हणू स्वीकारली आहे .मात्र भुसे समर्थकांन मध्ये नाराजीची चर्चा दिवसभर चालली.
नाशिक व रायगड या दोन्ही ठिकाणच्या पालकमंत्री पदांना स्थगिती दिल्याचे आदेश राज्याच्या सामन्य प्रशासनाने रात्री उशीरा काढल्याने व ते ही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस परदेशात असताना काढल्याने आश्चर्य व्यक्त केले जात होते .
सदर जीआर खालील प्रमाणे दर्शवित आहे.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा
