Friday, May 3, 2024
HomeUncategorizedमराठवाड्यात २७ हजार ग्राहकांचा वीज पुरवठा खंडित

मराठवाड्यात २७ हजार ग्राहकांचा वीज पुरवठा खंडित

औरंगाबाद – aurangabad

थकबाकी वसुलीसाठी महावितरणने (MSEDCL) आता कार्यकारी अभियंता, अधिक्षक अभियंता व मुख्य अभियंता यांच्यावर जबाबदारी सोपवून थकबाकीदारांविरोधात धडक मोहीम सुरू केली आहे. ५० हजार रुपये व त्यापेक्षा जास्त थकबाकी असणाऱ्या ग्राहकांकडे महावितरणचे पथक जाऊन बिले वसूल करत आहे. थकबाकीदारांची कोणतीही पर्वा न करता त्या ग्राहकांचा वीज पुरवठा (Power supply) बंद करून मीटर, वायर जप्त करण्याची कारवाई सुरू केली असून आतापर्यंत मराठवाडयात २७ हजार ग्राहकांचा वीज पुरवठा खंडित करण्यात आला आहे,

- Advertisement -

महावितरण प्रादेशिक कार्यालय अंतर्गत मराठवाडयातील मोठ्या थकबाकीदारांविरोधात करण्यात येत असलेल्या कारवाई संदर्भात सहव्यवस्थापकीय संचालक डॉ. मंगेश गोंदाबले यांनी व्हीडिओ कॉन्फरन्सिंगद्रारे मुख्य अभियंते, अधिक्षक अभियंते, कार्यकारी अभियंते यांना सूचना केल्या. विकलेल्या विजेचे दरमहा पैसे न आल्याने महावितरण प्रचंड अडचणीचा सामना करत आहे. यासाठी थकबाकी वसूल करतांना कार्यकारी अभियंता यांनी ५० हजार ते १ लक्ष रूपये, अधिक्षक अभियंतायांनी १ लक्षते ५ लक्ष रूपये व मुख्य अभियंता यांनी ५ लक्ष रूपयांपेक्षा जास्त थकबाकी असणाऱया ग्राहकांचा वीज पुरवठा खंडित करा अन्यथा मीटर, वायर जप्त करण्याचे आदेश महावितरणने दिले आहेत. वीज बिल वसूली ही लाईनमन व इतर कर्मचारी करत होते. आता मोठ्या ग्राहकांकडील थकबाकी वसूलीसाठी कार्यकारी अभियंता, अधिक्षक अभियंता व मुख्य अभियंता यांच्या नियंत्रणाखाली महावितरण कर्मचार्‍यांच्या विशेष वसूली पथकाची नियुक्ती केलेली आहे. सदर वरिष्ठ अधिकारी वसुलीसाठी मैदानात उतरून वसूलीसाठी सरसावले आहेत.

वरिष्ठ अभियंते ग्राहकांशी संपर्क साधून थकबाकी भरण्याची विनंती करत आहेत. थकबाकी न भरणाऱ्या ग्राहकांचा वीज पुरवठा तात्काळ खंडित करून मीटर, वायर जप्त करण्याची जोरदार कारवाई सुरू केली आहे. दरम्यान, थकबाकीसाठी वीज पुरवठा बंद असताना शेजाऱ्यांकडून अथवा आकडा टाकून किंवा इतर मार्गाने वीज पुरवठा सुरू आहे का? ,ग्राहक अंधारात आहे का? याची फेरतपासणी करण्यासाठी विशेष पथक पाहणी करत आहे. अशा ठिकाणी परस्पर वीज पुरवठा सुरू असल्याचे निदर्शनास आल्यास विद्युत कायदा २००३ नुसार कडक कारबाई करण्याचे आदेश देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

मराठवाडयात १ ते १८ एप्रिल २०२२ या कालावधीत महावितरणने ४४ कोटी ७८ लाख ३ हजार रूपयांच्या थकबाकीसाठी १४ हजार ४२४ ग्राहकांचा वीज पुरवठा कायमस्वरूपी खंडित केला आहे. तर ११ हजार ६३४ ग्राहकांचा ३६ कोटी ३७ लाख ३ हजार रूपयांच्या थकबाकीसाठी वीज पुरवठा तात्पुरता खंडित करण्याची कारवाई करण्यात आली आहे. असे एकूण २६ हजार ५८ ग्राहकांचा ८१ कोटी १५ लाख ६ हजार रूपयांच्या थकबाकीसाठी वीज पुरवठा खंडित करण्याची कारवाई करण्यात आली आहे. थकबाकीदारांनी चालू बिलासह थकबाकी भरून सहकार्य करण्याचे आवाहन महावितरण औरंगाबाद प्रादेशिक कार्यालयाचे सहव्यवस्थापकीय संचालक डॉ. मंगेश गोंदावले यांनी केले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या