अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar
प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा दोन अंतर्गत घरकुल योजनेत नगर जिल्ह्यातील 12 हजार लाभार्थ्यांना पहिला हप्ता वितरित करण्यात येणार आहे. ओरिसा राज्याच्या भुवनेश्वर येथून ऑनलाईन पध्दतीने संगणकाच्या एका क्लिवर हे वितरण होणार आहे. दरम्यान, मंजुरी दिलेल्या 8 हजार 676 घरकुलाच्या उद्दिष्टाच्या 140 टक्के अधिक काम करत नगर घरकुल योजनेच्या पहिला हप्ता वितरीत करण्यात राज्यात अव्वल ठरणार आहे.
पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते आज (दि.17) रोजी देशातील दहा लाख लाभार्थींना प्रधानमंत्री आवास योजना टप्पा दोन योजनेतील पहिल्या हप्त्याचे वितरण होणार आहे. हा मूळ कार्यक्रम भूवनेश्वर याठिकाणी होणार आहे. यात देशासह राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात घरकुलाच्या पहिल्या हप्त्यासाठी पात्र असणार्या लाभार्थी यांच्या खात्यावर निधी वर्ग होणार आहे. पीएम आवास घरकुल योजनेत सरकारकडून नगर जिल्ह्यासाठी 21 हजार 893 घरकुलांचे उद्दिष्ट देण्यात आले होते. तसेच यापैकी पात्र लाभार्थींचे कागदपत्र घेऊन ऑनलाईन रजिस्ट्रेशन करणे व ऑनलाईन घरकुलांना मंजुरी देणे, तसेच पहिला हप्ता वितरण करणे ही प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
महाराष्ट्रात घरकुल योजनेसाठी 2 लाख 51 हजार लाभार्थींना पंतप्रधान यांच्या हस्ते ऑनलाईन संगणकाच्या एका क्लिकवर हप्ता वितरण करण्यात येणार आहे. पहिला हप्ता वितरीत करण्यासाठी नगरला 8 हजार 676 लाभार्थींचे उद्दिष्ट देण्यात आले होते. त्यानंतर मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या अधिकारी कर्मचारी यांनी दिवसरात्र दोन टीमनुसार काम करत पात्र 17 हजार 800 लाभार्थ्यांच्या घरकुलांना मंजुरी दिली. यातील 8 हजार 676 लाभार्थ्यांना पहिला हप्ता वितरित करण्यात येणार होता. मात्र, नगर जिल्ह्याने जादा काम केल्याने उद्दिष्टाच्या 140 पट अधिक 12 हजार लाभार्थ्यांना घरकुलाचा पहिला हप्ता मिळणार आहे. अशी कामगिरी करणारी नगर जिल्हा परिषद राज्यात अव्वल आहे.
मुख्य कार्यकारी अधिकारी येरेकर यांनी नेवासा, श्रीरामपूर, राहुरी, श्रीगोंदा या तालुक्यांना भेटी देऊन जास्तीतजास्त लाभार्थ्यांची घरकुल ऑनलाईन नोंदणी व प्रथम हप्ता वितरण व्हावे, यासाठी सर्व यंत्रणा यांना निर्देश दिले. तसेच या कामाचा रोज आढावा घेत रात्री दोन वाजेपर्यंत युद्धपातळीवर घरकुलांना मंजुरीचे काम केले. या कामात जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक समर्थ शेवाळे, सहायक प्रकल्प अधिकारी किरण साळवे, सर्व कर्मचारी, गटविकास अधिकारी, विस्तार अधिकारी, ऑपरेटर, ग्रामीणगृह अभियंता यांच्यामुळे कामगिरी यशस्वी झाली. उर्वरित पात्र लाभार्थीचे कागदपत्र घेऊन 100 टक्के लाभार्थ्यांना 8 दिवसांत मंजुरी देण्याचे काम करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.