अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
प्रधानमंत्री आवास योजना व राज्य पुरस्कृत घरकूल योजनांमधील मंजूर घरकुलांसाठी शासनाने मोफत 5 ब्रास वाळू देण्याची घोषणा केली आहे. त्याप्रमाणे जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेने (डीआरडीए) महसूल प्रशासनाकडे जिल्ह्यातील मंजूर 93 हजार 24 घरकुलांसाठी 4 लाख 65 हजार 120 ब्रास मोफत वाळूची मागणी केली आहे. जिल्ह्यात 2024-25 या वर्षात प्रधानमंत्री आवास योजना टप्पा-2 अंतर्गत 81 हजार 179 व राज्य पुरस्कृत योजनांचे 11 हजार 845 असे एकूण 93 हजार 24 घरकुले मंजूर आहेत. या मंजूर घरकुलांपैकी 68 हजार 311 लाभार्थींना प्रथम हप्त्याचे वाटपही झालेले आहे. नुकतेच (महिला दिनी) जिल्हा प्रशासनाच्या वतीने या मंजूर घरकुल बांधकामाचे भूमिपूजन जिल्ह्यातील 1311 ग्रामपंचायतींमध्ये करण्यात आले.
सर्वांसाठी घरे या मिशन अंतर्गत प्रधानमंत्री आवास योजना शहरी आणि ग्रामीण भागात राबविली जात आहे. शहरी भागातील लाभार्थ्यांना 2 लाख 30 हजार, तर ग्रामीण भागातील नागरिकांना 1 लाख 30 हजार रुपयांचा लाभ मिळतो. नुकतेच महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी घरकुलांना मोफत वाळू देण्याची घोषणा केली आहे. त्यानुसार जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेकडून महसूल विभागाच्या जिल्हा गौणखनिज अधिकार्यांकडे 93 हजार 24 घरकुलांसाठी प्रत्येकी 5 ब्रास या प्रमाणे 4 लाख 65 हजार 120 ब्रास वाळूची मागणी केली आहे.
3 हजार 841 भूमीहिनांना जागा देणार
अहिल्यानगर जिल्ह्याने गत 3 वर्षात राज्यासाठी दिशादर्शक काम केले असून घरकुल योजनेत अहिल्यानगर जिल्हा राज्यात प्रथम क्रमांकावर राहिला आहे. प्रधानमंत्री आवास योजनेत 6 हजार 419 भूमीहीन लाभार्थींना जागा उपलब्ध करून देण्यात आली. आता टप्पा-2 मधील 3841 लाभार्थींना जागा उपलब्ध करून देण्याचे प्रशासनाचे लक्ष्य आहे.
जिल्ह्यात 20 वाळूसाठे सुरू
जिल्ह्यात सध्या महसूलकडून 20 वाळूसाठे सुरू आहेत. प्रामुख्याने वाळू साठे संगमनेर, कोपरगाव, राहुरी, राहाता, श्रीरामपूर, नेवासा अशा तालुक्यांतून जाणार्या नद्यांकाठी आहेत. त्यामुळे ही मोफत वाळू नदीशेजारील गावांत मंजूर घरकुलांसाठी फायद्याची ठरते. दक्षिण जिल्ह्यातील गावांना ही वाळू आणण्यासाठी वाहतूक खर्च परवडत नाही, असे काही लाभार्थींचे म्हणणे आहे. कारण यात वाहतुकीचा खर्च घरकूल लाभार्थ्यांना करावा लागतो.