मुंबई | Mumbai
राज्यात महापालिकांच्या निवडणुकांचे बिगुल वाजले आणि राजकीय घडामोडींना वेग आला. महापालिकांच्या निवडणुका घोषित होताच अनेक महत्त्वाच्या नेतेमंडळींना आपल्या गळाला लावण्यासाठी सर्वच राजकीय पक्ष जोरदार प्रयत्न करत आहे. असे असतानाच मराठवाड्यातील हिंगोली जिल्ह्यातील काँग्रेसच्या विधान परिषदेच्या माजी आमदार प्रज्ञा सातव यांनी आज सकाळी विधान परिषदेच्या आमदारकीचा राजीनामा दिला. आणि काही वेळापूर्वीच भाजपमध्ये प्रवेश केला आहे.
बुधवारपासून (ता. 17 डिसेंबर) काँग्रेसच्या विधान परिषदेतील आमदार प्रज्ञा सातव या भाजपात जाणार असल्याची चर्चा सुरू होती. परंतु, काँग्रेस नेत्यांनी या चर्चांना फेटाळून लावले. पण गुरुवारी सकाळीच सातव या विधिमंडळात हजर झाल्या आणि त्यांनी त्यांच्या काँग्रेसच्या आमदारकीचा राजीनामा दिला. हा राजीनामा दिल्यानंतर तासाभरातच त्यांनी भाजपामध्ये रितसर पक्षप्रवेश केला.
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत मुंबईतील भाजप कार्यालयात पक्ष प्रवेश झाला आहे. प्रज्ञा सातव या काँग्रेस पक्ष सोडणार असल्याची बातमी समोर आल्या क्षणापासून त्यांनी हा निर्णय का घेतला, असा एकच प्रश्न विचारला जात होता. त्यावर प्रज्ञा सातव यांनी विकासाचे कारण पुढे केले.
नेमक्या काय म्हणाल्या प्रज्ञा सातव?
मला आणि माझ्या कार्यकर्त्यांना भाजपच्या परिवारात सामावून घेतले, यासाठी मी मनापासून तुम्हा सर्वांना धन्यवाद देते. साहेब माझे पती सर्वांचे लाडके दिवंगत खासदार राजीव सातव हे हिंगोलीचे भूमीपूत्र होते. त्यांनी हिंगोलीच्या विकासासाठी अथक प्रयत्न केले. त्यांच्या मातोश्री रजनीताई सातव यांनीही हिंगोलीच्या विकासासाठी आजीवन काम केले होते. त्या दोघांसोबत राहून मी गेली २० वर्षे एनजीओ, शिक्षणसंस्थांमध्ये काम करत होते. साहेबांच्या निधानंतर मला २०२१ साली विधिमंडळात आमदार म्हणून काम करण्याची संधी मिळाली. त्यावेळी मला सर्वांचे सहकार्य मला लाभले. मी आज इथवर येण्याचा माझ्या कार्यकर्त्यांचा मोलाचा वाटा आहे, असे प्रज्ञा सातव यांनी म्हटले.
तसेच, माझ्या कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव, राजीव सातव यांचे हिंगोलीच्या विकासाचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आणि देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्त्वात महाराष्ट्राचा चौफेर विकास घडत आहे. त्यामध्ये आम्हाला साथ द्यायची असल्याने आम्ही भाजपामध्ये सामील होण्याचा निर्णय घेतला. राजीव सातव यांचे आशीर्वाद, देवेंद्र फडणवीसांची साथ, सर्वजण मिळून करु संकटांवर मात असे म्हणत मी एवढेच आश्वासन देते की, मी आणि माझे कार्यकर्ते हे, सबका साथ, सबका विकास, सबका प्रयास आणि सबका विश्वास या धोरणाने काम करत राहू, असे यावेळी प्रज्ञा सातव यांनी म्हटले. महत्त्वाची बाब म्हणजे, यावेळी त्यांनी काँग्रेस सोडण्याबाबत काहीच भाष्य केले नाही.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा




