नाशिक | Nashik
आजपासून शिर्डीत (Shirdi) राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे दोन दिवसांचे अधिवेशन सुरु होत आहे. त्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे आमदार आणि खासदार शिर्डीत हजर झाले आहेत. या अधिवेशनातून राष्ट्रवादीत आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे रणशिंग फुंकण्याची शक्यता आहे. तर दुसरीकडे या अधिवेशनाला माजी मंत्री आणि आमदार छगन भुजबळ उपस्थित राहणार की नाही? याबाबत अजूनही संभ्रम आहे. कारण दोन दिवसांपूर्वी मुंबईत पक्षाचे अध्यक्ष आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत आमदारांची बैठक पार पडली होती. या बैठकीला भुजबळ यांनी दांडी मारली होती. त्यामुळे ते पक्षाच्या शिर्डीतील अधिवेशनाला हजर राहणार का? यासंदर्भात प्रश्न उपस्थित केला जात आहे.
छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांना मंत्रिमंडळात संधी न मिळाल्याने ते कमालीचे नाराज झाले होते. यानंतर भुजबळ यांनी पत्रकार परिषद घेऊन जाहीरपणे आपली नाराजी देखील व्यक्त केली होती. तसेच पक्षाचे अध्यक्ष अजित पवार आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे व खासदार प्रफुल्ल पटेल (Praful Patel) यांच्यावर देखील नाराजी व्यक्त केली होती. त्यामुळे भुजबळ आणि राष्ट्रवादीतील नेत्यांमध्ये अबोला असल्याचे पाहायला मिळत आहे. पंरतु, आज शिर्डीत होणाऱ्या राष्ट्रवादीच्या अधिवेशनाला आमदार छगन भुजबळ उपस्थित राहणार असल्याची माहिती पक्षाचे खासदार प्रफुल्ल पटेल यांनी दिली आहे.
पटेल म्हणाले की, छगन भुजबळ पक्षाचे ज्येष्ठ नेते आहेत. काल मुंबईत माझी आणि त्यांची भेट झाली. काही गोष्टी असतात. पण त्यांची नाराजी टोकाची नाही. घरात बसून मार्ग काढू शकत नाही, अशी स्थिती नाही. छगन भुजबळ पक्षाचे आधारस्तंभ आहेत. ९९ व्या साली राष्ट्रवादी काँग्रेसची (Nationalist Congress Party) स्थापना झाली, तेव्हापासून ते पक्षाचे फ्रंटलाइन नेते आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसला नेहमीच त्यांचे मार्गदर्शन मिळेल याची मला खात्री आहे, असे त्यांनी म्हटले आहे. तसेच काल पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि खासदार प्रफुल्ल पटेल यांनी भुजबळ यांना शिबिराला उपस्थित राहण्याची विनंती केली होती. त्यानुसार भुजबळ अधिवेशनाला उपस्थित राहणार असल्याचे बोलले जात आहे.
दरम्यान, यावेळी भुजबळ राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना नेमकं काय मार्गदर्शन करतात हे बघणे महत्वाचे असणार आहे. तसेच दुसरीकडे मंत्रिमंडळाच्या बैठकीला गैरहजर राहणारे मंत्री धनंजय मुंडे (Minister Dhananjay Munde) हे देखील या राष्ट्रवादीच्या नवसंकल्प अधिवेशनाला उपस्थित राहणार आहेत. आज दुपारी १२ वाजेपर्यंत धनंजय मुंडे हे अधिवेशनाला हजेरी लावणार आहेत.