नवी दिल्ली वृत्तसंस्था | New Delhi
अजित पवार यांच्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्षपद प्रफुल पटेल यांच्याकडे जाणार अशी चर्चा महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात गेल्या काही दिवसांपासून सुरु आहे. यावरुन राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि महाराष्ट्राच्या राजकारणात प्रचंड गदारोळ झाला होता. विरोधकांनीही या प्रकरणात उडी घेतली असून, राजकीय वर्तुळात चर्चांना ऊत आला आहे. यावरून काही तर्क-वितर्क सुरू झाल्याचे पाहायला मिळत आहेत. यातच आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केलेल्या टीकेला आता राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे खासदार प्रफुल्ल पटेल यांनी प्रत्युत्तर दिले.
मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेससारख्या रांगड्या प्रादेशिक पक्षाचा राष्ट्रीय अध्यक्ष हा ‘पाटील’ हवा ‘पटेल’ नको, अशी भूमिका घेतली होती. यानंतर प्रफुल पटेल हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष बळकावून भाजपच्या दावणीला बांधणार, अशी वातावरणनिर्मिती झाली होती. या सगळ्या आरोपांना प्रफुल पटेल यांनी मंगळवारी प्रत्युत्तर दिले.
Praful Patel: राष्ट्रीय नेता निवडीपासून ते पक्षाचे विलिनीकरण, प्रफुल्ल पटेलांनी सगळंच सांगितलं
आमच्या पक्षात काय करायचं ते सांगणार का?
राज ठाकरे, ते माझ्या पक्षाशी संबंधित आहेत का, ते आमच्या पक्षात आहेत का? माझ्या पक्षाचा विधिमंडळ नेता आणि राष्ट्रीय अध्यक्ष कोण असावा, हे राज ठाकरे किंवा सकाळी नऊ वाजताचं बुलेटिन (संजय राऊत) हे ठरवणार का? आम्ही आमच्या पक्षात काय करावे, हे ते सांगत आहेत. अजित पवार यांच्यानंतर पक्षाचा नवा नेता निवडण्याची जबाबदारी कार्याध्यक्ष म्हणून माझ्यावर आहे. आम्ही योग्य निर्णय घेण्याच्या प्रक्रियेत आहोत. आम्ही सध्या विधिमंडळ नेता आणि उपमुख्यमंत्र्याची निवड केली आहे. आता आमचा पक्ष जरा स्थिरावल्यावर आम्ही दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाच्या विषयाकडे लक्ष देऊ, असे प्रफुल्ल पटेल यांनी म्हटले आहे.
मी कधीही राष्ट्रीय अध्यक्षपदाच्या स्पर्धेत नव्हतो
अजित पवार यांच्यानंतर आमच्या पक्षाची नेमून दिलेली प्रक्रिया पार पाडणे माझी जबाबदारी आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचा राष्ट्रीय अध्यक्ष मी सोडून अन्य कोणतीही व्यक्ती असेल. ती व्यक्ती योग्य असेल. मात्र, काहीजण उलटसुलट बातम्या चालवत आहेत. यामध्ये काही तथ्य नाही. मी कधीही राष्ट्रीय अध्यक्षपदाच्या स्पर्धेत नव्हतो. मी किंवा आमच्या पक्षातील कोणत्याही नेत्याने मी राष्ट्रीय अध्यक्षपदाच्या शर्यतीत असल्याचे सांगितले का?, असा सवाल प्रफुल पटेल यांनी उपस्थित केला.





