मुंबई । Mumbai
भारत-पाकिस्तान शस्त्रसंधीनंतर देशभरात तिरंगा यात्रांचे आयोजन सुरू असताना, वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना थेट प्रश्न विचारला आहे. ‘एक्स’ (पूर्वीचे ट्विटर) वर त्यांनी एक पोस्ट शेअर करत पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर सरकारच्या भूमिका आणि साजऱ्या होत असलेल्या उत्सवांवर गंभीर सवाल उपस्थित केला आहे.
“मोदी, पहलगाम हल्ल्यासाठी जबाबदार दहशतवादी अजूनही कुठे आहेत? तब्बल महिनाभर उलटून गेला. हल्ल्यातील मृतांच्या पत्नीला अद्याप न्याय मिळालेला नाही. मग कसला आनंदोत्सव?”, असा थेट सवाल त्यांनी पोस्टमध्ये उपस्थित केला आहे.
https://x.com/Prksh_Ambedkar/status/1924323873987670330
गेल्या 22 एप्रिल रोजी जम्मू-काश्मीरमधील पहलगामच्या बैसरन खोऱ्यात पर्यटकांवर अतिरेक्यांनी अंदाधुंद गोळीबार केला होता. या भीषण हल्ल्यात 26 जणांचा मृत्यू झाला होता, यामध्ये महाराष्ट्रातील 6 पर्यटकांचाही समावेश होता. दहशतवाद्यांनी मुद्दाम पुरुषांवर गोळीबार केला होता, अनेकांना डोक्यात गोळ्या झाडण्यात आल्या.
या घटनेनंतर देशभरात संतापाची लाट उसळली. प्रतिउत्तर म्हणून भारतीय सैन्याने 7 मे रोजी ‘ऑपरेशन सिंदूर’ अंतर्गत पाकव्याप्त काश्मीरमधील 9 दहशतवादी तळ क्षेपणास्त्रांनी उद्ध्वस्त केले. यात जैश-ए-मोहम्मदच्या बहावलपूर येथील मुख्यालयाचाही समावेश होता. या हवाई कारवाईत सुमारे 100 दहशतवादी ठार झाल्याची माहिती आहे.
दरम्यान, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे यांनीही पंतप्रधान मोदींना पत्र लिहून आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. त्यांनी नमूद केले की, सध्या देशात विजयाच्या प्रतीक म्हणून ज्या तिरंगा यात्रांचा उत्सव साजरा होत आहे, तो भावनिक संभ्रम निर्माण करणारा आहे.
“सध्याची परिस्थिती ही विजयाची नसून युद्धविरामाची आहे. अशावेळी उत्सव साजरा केला जाणे हे शहीद जवानांच्या बलिदानाचा अवमान वाटतो,” असे त्यांनी पत्रात म्हटले. अमित ठाकरे यांनी पुढे लिहिले, “मोदीजी, आपल्याकडून जनतेला विश्वास आहे की, आपण सैनिकांच्या बलिदानाबद्दल कृतज्ञ आहात. म्हणूनच, विजयाचा जल्लोष टाळून संयम पाळावा आणि शहीदांना खरी श्रद्धांजली द्यावी, ही नम्र विनंती.”