मुंबई | Mumbai
पुण्यातील (Pune) पोर्शे अपघात प्रकरणावरून राज्याचे राजकारण ढवळून निघाले आहे. या प्रकरणात अपघातातील अल्पवयीन आरोपीसह पोलिसांनी (Police) त्याच्या वडिलांना आणि आजोबांना अटक (Arrested) केली आहे. या तिघांना वाचविण्यासाठी सरकारमधील काही नेते प्रयत्न करत असल्याचा आरोप विरोधकांकडून करण्यात येत आहे. त्यामुळे या प्रकरणात सरकारची कोंडी झाल्याचे पाहायला मिळत आहे.
त्यातच आता वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar)यांची या प्रकरणात एन्ट्री झाली असून त्यांनी पुण्यातील बांधकाम व्यवसायिक विशाल अग्रवाल (Vishal Agarwal) याच्यासोबत बांधकाम व्यवसायात कोणाची भागीदारी आहे? यासोबतच अग्रवालने कोणत्या राजकीय पक्षांना पैसा पुरवला? याचा खुलासा झाल्यास अपघातामधील संशयितांना वाचवणारी सर्वच नाव समोर येतील असे म्हटले आहे. ते अकोल्यात बोलत होते.
यावेळी ते म्हणाले की, अपघाताची ही एकच केस नसून अशा अनेक केसेस आहेत. अपघाताच्या दुसऱ्या दिवशी तिथे असणारे डॉ. जोंधळे यांनाही अस फरपटत नेले. डॉ. जोंधळेंचे नाव कुठेही येत नाही, त्यांनाही असे मारण्यात आले आहे. त्यामुळे मी असे मानतो की, त्याच्या मागे राजकारण जे काही असेल पण हा वाहनचालकांचा निष्काळजीपण आहे, त्यालाही कुठेतरी कडक शिक्षा केली पाहिजे. तसेच या पुणे अपघात प्रकरणात विशाल अग्रवालने कोणत्या राजकीय पक्षांना पैसा पुरवला? विशाल अग्रवालसोबत बांधकाम व्यवसायात कोणाची भागिदारी आहे? अग्रवालने कोणत्या राजकीय पक्षांना पैसा पुरवला?, याचा खुलासा झाला तर त्याला वाचवणारी सर्वच नाव समोर येतील,असेही आंबेडकरांनी म्हटले.
त्यासोबतच या प्रकरणात अजित पवारांवर (Ajit Pawar) होणाऱ्या आरोपांबाबत मी सध्या काहीच बोलणार नाही. सध्या पोलीस सांगतात त्याच नावांवर विश्वास ठेवावा लागेल. तसेच बेदरकारपणे वाहन चालवण्यासंदर्भात जोपर्यंत नवा कायदा होत नाही तोपर्यंत अशा घटना घडतच राहतील, असेही प्रकाश आंबेडकर म्हणाले.