मुंबई । Mumbai
राज्यातील आगामी महानगरपालिका निवडणुकांच्या तोंडावर महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी उलथापालथ पाहायला मिळत आहे. पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिकेसाठी शरद पवार आणि अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसने एकत्र येण्याचा निर्णय घेतल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. याच पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी शरद पवार यांच्यावर जोरदार टीकास्त्र सोडले असून, या मैत्रीला भाजपशी संधान बांधण्याची नांदी म्हटले आहे.
प्रकाश आंबेडकर यांनी दोन्ही राष्ट्रवादीच्या एकत्र येण्यावर भाष्य करताना म्हटले की, “काका आणि पुतणे एकत्र आले आहेत, याचा अर्थ त्यांचे आता विलीनीकरणच झाले आहे.” त्यांनी पुढे असा दावा केला की, अजित पवारांच्या गटासोबत हातमिळवणी करून शरद पवारांनी प्रत्यक्षात भारतीय जनता पक्षाच्या दिशेने जाण्याचे पहिले पाऊल टाकले आहे. शरद पवार जे बोलतात, त्याच्या नेमकी उलट कृती करतात, असा उपरोधिक टोलाही आंबेडकरांनी यावेळी लगावला.
यावेळी आंबेडकरांनी खासदार सुप्रिया सुळे यांच्या भविष्यातील राजकीय भूमिकेवरही खोचक टिप्पणी केली. “जर येणाऱ्या काळात सुप्रिया सुळे केंद्रात मंत्री झाल्या, तर धर्मनिरपेक्ष (सेक्युलर) मतदारांनी त्याचे आश्चर्य वाटून घेऊ नये,” असे म्हणत त्यांनी राष्ट्रवादीच्या पुढील वाटचालीबाबत शंका उपस्थित केली. तसेच, उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये आता राज ठाकरे यांचा शिरकाव झाला असल्याचे सांगत, काँग्रेसने सावध पवित्रा घेण्याची गरज असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
राज्यात एकीकडे पवारांची युती चर्चेत असताना, दुसरीकडे मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीने अधिकृतपणे युती जाहीर केली आहे. २८ डिसेंबर रोजी झालेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत या नव्या समीकरणावर शिक्कामोर्तब करण्यात आले. मुंबईतील २२७ जागांपैकी वंचित बहुजन आघाडी ६२ जागांवर आपले उमेदवार उभे करणार आहे, तर उर्वरित जागांवर काँग्रेस निवडणूक लढवणार आहे.
काँग्रेससोबतच्या युतीचे कारण स्पष्ट करताना प्रकाश आंबेडकर म्हणाले की, काँग्रेसने मुंबईत ‘स्वबळाचा’ नारा दिल्याने आम्ही त्यांना साथ देण्याचा निर्णय घेतला. जर काँग्रेसने ही भूमिका पाळली नाही, तर त्यांचे अस्तित्व धोक्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला. इतर महापालिकांच्या बाबतीत भाजपला वगळून इतर पक्षांशी बोलणी सुरू असून, जिथे चर्चा यशस्वी होणार नाही, तिथे वंचित बहुजन आघाडी स्वबळावर निवडणूक लढवण्यास तयार असल्याचे त्यांनी जाहीर केले.





