मुंबई । Mumbai
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शेतकरी कर्जमाफीबाबत केलेल्या वक्तव्यावर वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे.
अजित पवारजी, तुम्ही म्हणालात, “सरकार शेतकऱ्यांचे कर्ज किती काळ माफ करत राहणार?” पण खरा प्रश्न असा आहे की, तुम्ही आणि तुमचे सरकार शेतकऱ्यांचे हक्क किती काळ नाकारत राहणार? कधीपर्यंत हजारो कोटी रुपयांचे कॉर्पोरेट कर्ज माफ केले जाईल आणि शेतकऱ्यांच्या मदतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जातील? अजित पवार, महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी आत्महत्या कराव्यात असे वाटते का तुम्हाला?, असा संतप्त प्रश्न प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे.
प्रकाश आंबेडकर यांनी एक्सवर मोठी पोस्ट लिहून राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलेल्या विधानावर प्रतिक्रिया दिली. महाराष्ट्रातील शेतकरी अजूनही अवकाळी पाऊस, पिकांचे नुकसान आणि शेतमालाला भावाच्या अभावामुळे अडचणीत आहेत. हे शेतकरी कठोर परिश्रमाने अन्न पिकवतात परंतु, तुमचे सरकार त्यांच्या कष्टाची परतफेडही करू शकत नाही!, असे प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले आहे.
शेतकऱ्यांच्या मागण्या पूर्णपणे रास्त आहेत. आश्चर्याची गोष्ट म्हणजे यापैकी कोणताही मुद्दा नवीन नाही. निवडणुकीपूर्वी प्रसिद्ध झालेल्या भाजपच्या जाहीरनाम्यात या समस्या सोडवण्याचे आश्वासन देण्यात आले होते. पण, वास्तव असे आहे की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि तुम्ही तिघांनी मिळून महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचा विश्वासघात केला आहे. सोयाबीनसाठी किमान आधारभूत किंमत (एमएसपी) प्रति क्विंटल ५,३२८ रुपये जाहीर करण्यात आली आहे पण, शेतकऱ्यांना फक्त ३,५०० ते ४,००० रुपये भाव मिळत आहेत! म्हणजे जवळजवळ ३० टक्के कमी! कापसाची स्थितीही तितकीच भयानक आहे, असे प्रकाश आंबेडकर यांनी सांगितले.
अवकाळी पावसाने राज्यातील २९ जिल्ह्यांना उद्ध्वस्त केले आहे. ६८ लाख हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्रावरील पिके नष्ट झाली आहेत. सरकारने मदत जाहीर केली पण, जमिनीवर असलेल्या शेतकऱ्यांपर्यंत एक पैसाही पोहोचला नाही! शेतकऱ्यांनी दिवाळी अंधारात घालवली आणि आता त्यांच्या आशाही पावसात वाहून गेल्या आहेत. तुमच्या सरकारला शांत झोप मिळावी, म्हणून महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी आत्महत्या कराव्यात असे तुम्हाला वाटते का? शेतकऱ्यांना भिक नको आहे, त्यांना त्यांचे हक्क हवे आहेत ! वंचित बहुजन आघाडी तुमच्या शेतकरीविरोधी विधानाचा तीव्र निषेध करते!!, या शब्दांत प्रकाश आंबेडकर यांनी हल्लाबोल केला.
दरम्यान, खूप मोठ्या प्रमाणावर आम्ही सवलती देतोय. योजना देतोय. हे सगळे देताना एक लाख कोटीपेक्षा जास्त रक्कम लागते. शून्य टक्के व्याजदराने पैसे दिल्यावर तुम्हीपण वेळच्या वेळी पैसे फेडायची सवय लावा ना. सारखेच फुकटात, सारखेच फुकटात आणि सारखेच माफ, सारखेच माफ; कसे व्हायचे? असे चालत नाही, असे म्हणत अजित पवारांनी कर्जमाफीच्या मागणीवरून शेतकऱ्यांना सुनावले. एका कार्यक्रमात बोलताना अजित पवारांनी सातत्याने शेतकरी कर्जमाफी करण्यावरून नाराजी व्यक्त केली.




