मुंबई । Mumai
कोल्हापूरातील इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांना जीवे मारण्याची धमकी काही दिवसापूर्वी मिळाली होती. या प्रकरणी प्रशांत कोरटकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कोरटकर यांच्या जामीनावर आज मुंबई उच्च न्यायालयात आज सुनावणी झाली.
न्यायालयाने कोल्हापूर सत्र न्यायालयाचे निरीक्षण काढून टाकण्याचे निर्देश दिले असून, राज्य सरकारची बाजू ऐकून योग्य निर्णय घ्यावा असे आदेश दिले आहेत. यामुळे कोरटकरला मोठा झटका बसला आहे.
प्रशांत कोरटकरवर इतिहासकार इंद्रजित सावंत यांना फोनवर धमकावल्याचा आरोप आहे. तसेच, छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराजांबद्दल अपमानास्पद वक्तव्य केल्याचे त्याच्यावर आरोप आहेत. या प्रकरणी कोल्हापूर आणि नागपूर येथे तक्रारी दाखल झाल्या होत्या. कोल्हापूर सत्र न्यायालयाने त्याला अंतरिम जामीन मंजूर केला होता. मात्र, राज्य सरकारने या जामीनाविरोधात पावले उचलल्याने हे प्रकरण उच्च न्यायालयात गेले.
न्यायालयाच्या निर्णयानंतर विरोधी पक्षाने सरकारला लक्ष्य केले. कोरटकरला जामीन मिळाल्यामुळे सरकारवर अनेक प्रश्न उपस्थित करण्यात आले. दरम्यान, या प्रकरणात वकील असीम सरोदे यांनी माध्यमांशी संवाद साधला.
त्यांनी प्रश्न उपस्थित करत म्हटले की, “प्रशांत कोरटकर सध्या मुंबईत आहे हे सर्वांना माहीत आहे, पण तरीही त्याला अटक होत नाही. यामागे राजकीय संरक्षण आहे का?” या संपूर्ण प्रकरणामुळे कोल्हापूर आणि नागपूरमध्ये मोठी चर्चा सुरू झाली आहे. पुढील सुनावणीत काय निर्णय घेतला जातो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.