कोल्हापूर | Kolhapur
छत्रपती शिवाजी महाराजांचा (Chhatrapati Shivaji Maharaj) अपमान आणि इतिहास संशोधक इंद्रजित सावंत (Indrajit Sawant) यांनी धमकी देणाऱ्या प्रशांत कोरटकरला कोल्हापूर पोलिसांनी काल (दि.२४) रोजी तेलंगणा येथून अटक केली. त्यानंतर कोरटकरला घेऊन पोलीस कोल्हापुरातील जुना राजवाडा पोलीस स्टेशनमध्ये (Old Palace Police Station) दाखल झाले.
यानंतर प्रशांत कोरटकरला (Prashant Koratkar) आज (दि.२५) रोजी कोर्टात हजर करण्यात आले असता त्याला तीन दिवसांची म्हणजेच (दि.२८ मार्चपर्यंत) पोलीस कोठडी सुनावण्यात आली. त्यापूर्वी त्याची वैद्यकीय चाचणी करण्यात आली. यानंतर दुपारी १२. ३० वाजेच्या सुमारास कोरटकरला कोर्टात हजर करण्यात आले. यावेळी पोलिसांकडून कोरटकरला सात दिवसांची पोलीस कोठडी (Police Custody) देण्यात यावी अशी मागणी करण्यात आली. मात्र, त्यानंतर कोर्टाने कोरटकरला तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.
दरम्यान, कोरटकरला कोल्हापुरात (Kolhapur) आणल्यापासून कोल्हापुरातील राजकीय वातावरण तापलं आहे. आज कोर्टात नेण्यावेळी शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी शिवप्रेमींकडून आंदोलन करण्यात आले. यावेळी शिवप्रेमींकडून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. तसेच पोलीस ठाणे आणि कोर्टाच्या बाहेर लोकांची मोठी गर्दी जमली होती. या गर्दीतून वाट काढत पोलिसांनी (Police) कोरटकरला न्यायालयात (Court) हजर केले.