मुंबई | Mumbai
राज्यातील महायुती सरकारमध्ये अनेक विषयांवरुन सत्ता संघर्ष सुरू असल्याची चर्चा होती. खाते वाटप, मंत्रिमंडळ विस्ताराच्या अनुषंगाने महायुतीत सर्वकाही आलबेल नसल्याचे म्हटले जात होते. तर, दुसरीकडे महायुतीच्या नेत्यांकडून ऑल इज वेल असल्याचे सांगण्यात येत होते. आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिलेला शब्द पूर्ण केला आहे. एसटी महामंडळाचे अध्यक्ष म्हणून परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची नियुक्ती करण्यात आली आहे. महाराष्ट्र शासन केंद्रीय अधिनियमान्वये तयार केलेल्या नियम व आदेशानुसार ही नियुक्ती करण्यात आली आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मागील सरकारच्या काळातील काही निर्णयांच्या चौकशीस सुरुवात केली होती. त्यानंतर एसटी महामंडळाच्या अध्यक्षपदी आयएएस अधिकारी असलेल्या संजय सेठी यांची नियुक्ती केली. एसटी महामंडळाचे अध्यक्षपद हे परिवहन खात्याच्या मंत्र्यांकडे जाते. मात्र, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सनदी अधिकाऱ्यांची नियुक्ती केल्याने चर्चांना उधाण आले होते. नंतर मुख्यमंत्र्यांनी एसटी महामंडळाच्या अध्यक्षपदाचा निर्णय मागे घेतला होता. आता एसटी महामंडळावर अधिकृतपणे परिवहनमंत्री प्रताप सरनाईकच राहणार असल्याचा शिक्कामोर्तब झाले आहे.
काय म्हणाले प्रताप सरनाईक
प्रताप सरनाईक म्हणाले की, महाराष्ट्राच्या सर्वसामान्य जनतेची “लोकवाहिनी” असलेल्या एसटीला भविष्यात आर्थिक दृष्ट्या सक्षम करून एक चांगली दर्जेदार परिवहन सेवा निर्माण करण्यासाठी मी कटिबद्ध आहे. आपल्याला या पदावर नियुक्त करून महाराष्ट्राच्या सर्वसामान्य जनतेची सेवा करण्याची संधी दिल्याबद्दल राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आभार, असे प्रताप सरनाईक यांनी म्हटले आहे.
एसटीचे अध्यक्षपद
१९६० मध्ये महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाची (एसटी महामंडळ) स्थापना करण्यात आली. र.गो.सरैय्या हे महामंडळाचे पहिले अध्यक्ष होते. त्यानंतर अनेक महत्त्वाच्या व्यक्तींनी एसटी महामंडळाचे अध्यक्षपद भूषविले आहे. प्रताप सरनाईक हे एसटी महामंडळाचे २६ वे अध्यक्ष असणार आहेत. राज्यात २०१४ साली युती सरकारच्या काळात एसटी महामंडळाचे अध्यक्षपद शिवसेनेकडे होते. यानंतर 2014-2019 या काळात एसटी महामंडळाचे अध्यक्षपद शिवसेना नेते दिवाकर रावते यांच्याकडे होते. तर 2019 मध्ये मविआ सरकारच्या काळात शिवसेनेचे नेते अनिल परब यांच्याकडे एसटी महामंडळाचे अध्यक्षपद होते. एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केल्यानंतर राज्यात महायुतीचे सरकार स्थापन झाले. त्यामुळे शिंदे सरकारच्या काळात नियमामध्ये बदल करून एसटीचे अध्यक्षपद भरत गोगावले यांना देण्यात आले. विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर सप्टेंबर 2024 मध्ये भरत गोगावले यांना बळ देण्यासाठी आणि मंत्रिपदापासून वंचित राहिल्याने असलेली नाराजी दूर करण्यासाठी तत्कालीन शिंदे सरकारने एसटी महामंडळाचे अध्यक्ष त्यांना करण्याचा निर्णय घेतला होता.
राज्यातील महायुती सरकारमध्ये अनेक विषयांवरुन सत्ता संघर्ष सुरू असल्याची चर्चा होती. खाते वाटप, मंत्रिमंडळ विस्ताराच्या अनुषंगाने महायुतीत सर्वकाही आलबेल नसल्याचे म्हटले जात होते. तर, दुसरीकडे महायुतीच्या नेत्यांकडून ऑल इज वेल असल्याचे सांगण्यात येत होते. आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिलेला शब्द पूर्ण केला आहे. एसटी महामंडळाचे अध्यक्ष म्हणून परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची नियुक्ती करण्यात आली आहे. महाराष्ट्र शासन केंद्रीय अधिनियमान्वये तयार केलेल्या नियम व आदेशानुसार ही नियुक्ती करण्यात आली आहे.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा