उक्कलगाव |वार्ताहर|Ukkalgaon
श्रीरामपूर तालुक्यातील गळनिंब परिसरातील प्रवरा नदीपत्रात अनेक मासे मृत्यूमुखी पडल्याची घटना घडली. श्रीरामपूर तालुक्यातील उक्कलगाव-गळनिंब या परिसरातील प्रवरा नदीत मळीसदृश्य घाणपाणी नदीपात्रात सोडल्याने अनेक मासे मृत्यूमुखी पडल्याने येथील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. सध्या नदीत लाखो माश्यांचा खच साचून आहे. त्यामुळे परिसरात उग्रवास सुटला असून नागरिकांना मळमळीचे त्रास होऊ लागला आहे. मृतावस्थेत माशांचा तवंग नदीकाठी साचला आहे. प्रवरा नदीपात्रात मोठ्या प्रमाणावर पाण्याची आवक असून नदीपात्रात आलेले पाणी मोठ्या प्रमाणात दूषित असल्याने मासे मृत्यूमुखी पडले आहे.
एकीकडे पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी शासन स्तरावर मोठ्या प्रमाणात प्रयत्न व जनजागृती केली जाते. तर दुसरीकडे विषारी पाणी नदीपात्रात सोडून शासनाच्या प्रयत्नांना वाटाण्याच्या अक्षदा दिल्या जात असल्याचे चित्र सध्या प्रवरा पट्ट्यात दिसत आहे. लाखो मासे, नदीतील इतर जलचर, नदीवर अवलंबून असलेले प्राणी-पक्षी तसेच माणसांचे जीवन धोक्यात आले आहे.
गळनिंब, उक्कलगाव, मांडवे, कुरणपूर, कडीत, फत्त्याबाद, चांडेवाडी, तांबेवाडी, एकलहरे, पटेलवाडी यासह गावातील वाड्या वस्त्यावरील ग्रामस्थ नदी पात्रातील पाणी जनावराना पाण्यासाठी पाणी वापरत असतात मात्र, नदीचे पाणी दूषित झाल्याने ग्रामस्थांचा पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. तरी प्रशासनाने त्वरित नदीत नवीन रोटेशन सोडून नदीपात्र स्वच्छ करावे, अशी मागणी जोर धरु लागली आहे.




