अलीकडे ‘जयभीम’ या दक्षिणात्य चित्रपटाबद्दल सर्वत्र चर्चा घडून येत आहे. मी हा चित्रपट पहिला नसल्यामुळे यावर माझं मत किंवा अभिप्राय व्यक्त करणे योग्य ठरणार नाही. या चित्रपटाने समाजाच्या सर्व स्तरात जी चर्चा घडवून आणली, जे विचारमंथन झालं ते मला फार महत्वाचं वाटतं. या चित्रपटाबद्दल सर्वात आधी सांगण्यात आलेली महत्वपूर्ण बाब म्हणजे संपूर्ण सिनेमात कुठेही ‘जयभीम’ या शब्दाचा उच्चार किंवा उल्लेख नाहीये. पण तरीही या सिनेमाला हे नाव का दिलं असावं याची चर्चा वेगवेगवेळ्या धुरिणांनी केली आहे. यात चित्रपट समीक्षक-अभ्यासक-पत्रकार-विचारवंत-सामाजिक प्रश्नांचे अभ्यासक-सामाजिक कार्यकर्ते-माध्यम तज्ञ-राजकीय नेते यांचा समावेश आहे.
प्रत्येकाने आपापल्या परीने भाष्य केलं आहे. याबाबत मते मांडली आहेत. काही वृत्त वाहिन्यांनी यावर चर्चा देखील घडवून आणली आहे. अशा प्रकारचे चित्रपट मराठी आणि हिंदीत का निर्माण होत नाहीत, याचीही चर्चा करण्यात आली. दाक्षिणात्य चित्रपटसृष्टी आणि बॉलीवूड तसेच मराठी व इतर प्रादेशिक चित्रपट उद्योग यांची वैशिष्ट्ये देखील या निमित्ताने चर्चेत आली. एकूण सर्वांच्या विचारांचा आढावा घेतला तर असं लक्षात येतं की, ‘जयभीम’ हा चित्रपट अनेक अंगांनी वेगळा आहे. क्रांतिकारी आहे असं म्हटलं तरी चालेल. यातून एका प्रखर सामाजिक वास्तवाचे भेदक दर्शन घडवण्यात आलं आहे. चित्रपट रसिकांना अंतर्मुख करणारा असा हा चित्रपट आहे, अशी प्रतिक्रिया लोकांनी दिली आहे. के. चंद्रू नावाच्या वकिलाने ( जे पुढे न्यायाधीश झालेत) एका आदिवासी कुटुंबावर झालेल्या अन्यायाविरोधात उभारलेला लढा ही या चित्रपटाची कथा. एका सत्य घटनेवर आधारित या चित्रपटाचे नायक म्हणजे के.चंद्रू. या चित्रपटाच्या निमित्ताने लोकांना पुन्हा एकदा या नायकाचे कर्तृत्व लक्षात आलं. सर्वस्वी वेगळा सिनेमा काढल्याबद्दल निर्माता आणि चित्रपटाचा अभिनेता सूर्या यास नक्कीच दाद दिली पाहिजे. शिवाय दिग्दर्शक टी.जे. ज्ञानवेल यांनाही श्रेय दिलं पाहिजे. आपल्यावर होणाऱ्या अन्याय-अत्याचाराच्या विरोधात वंचित-पडीत-उपेक्षित अशा अभावग्रस्त समाजाने निर्भयपणे उभे राहिले पाहिजे, असा संदेश हा चित्रपट देतो.
आपल्या राज्यातल्या जनतेला ‘जयभीम’ हा शब्द अपरिचित नाही. राम राम किंवा नमस्कार/नमस्ते या अभिवादनाला पर्याय म्हणून ‘जयभीम’ हा शब्द वापरला जातो. बाबासाहेबांविषयी आदर-कृतज्ञता-भक्तीभाव प्रदर्शित करण्यासाठी या शब्दाचा प्रयोग केला जातो. असं करणे केवळ बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयीचा आदर नि भक्ती नाहीये. तर यामागे त्यांनी दिलेला विचार, त्यांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत मिळवलेले यश, प्राप्त केलेला सन्मान,आधुनिक भारताच्या उभारणीत दिलेलं अतुलनीय नि अमूल्य योगदान, त्यांचं विस्मयचकीत करणारे बुद्धीवैभव, सबंध देशाला एकसंध ठेवणारे संविधान, भारताच्या उज्ज्वल भविष्यासाठी उचलेले अहर्निश कष्ट, त्यांनी पाहिलेलं समतामूलक समाजाचे स्वप्न, प्रतिगामी आणि सनातनी समूहाचा विरोध झुगारून सर्व भारतीय स्त्रियांच्या उत्थानासाठी केलेलं कार्य आणि प्रथमतः आणि अंतिमत:ही भारतीय आहे असे ठणकावून सांगणारी जाजवल्य देशभक्ती यास केलेला साष्टांग दंडवत म्हणजे ‘जयभीम’ असं प्रकर्षाने म्हणावंसं वाटतं.
अलीकडे अभ्यासामुळे, जाणीव जागृती झाल्यामुळे, वैचारिक परिवर्तन झाल्यामुळे अनेक बहुजन-आदिवासी समाजाचे विचारी लोकं (प्रामुख्याने पुरुष) ‘जयभीम’ म्हणताना दिसतात. सामाजिक चळवळीत काम करणारे, सामाजिक क्षेत्रात कार्यरत असणारे, शिक्षणाच्या क्षेत्रात काम करणारे सहजपणे जयभीम म्हणताना दिसतात. राजकारणी मंडळी प्रामुख्याने जनसभेला संबोधित करताना आणि आंबेडकर जयंती- महापरिनिर्वाण दिन – धम्मचक्र प्रवर्तन दिन निमित्ताने एकत्र आलेल्या जनसमुदायाशी संवाद साधताना जयभीम चा उच्चार करतात. अलीकडेच निधन झालेल्या प्रख्यात समाजशास्त्रज्ञ आणि स्त्रीवादी विचारवंत कमला भसीन ह्या बोलताना नेहमीच इतर संबोधनासमवेतच खूप आदराने आणि जोशात जयभीम शब्द उच्चारायच्या !
प्रख्यात विचारवंत हरी नरके आणि इतिहासाचे विद्वान प्रोफेसर उमेश बगाडे ही महनीय माणसं फार सहजतेने जयभीम म्हणताना दिसतात. याच पंक्तीत औरंगाबादच्या प्रोफेसर सुधीर गव्हाणे यांचं देखील नाव घेता येतं. ते सुद्धा फार आत्मीयतेने जयभीमचा उच्चार करतात. सामाजिक कार्यकर्त्या, लेखिका advocate निशा शिवूरकर यांचा देखील या ठिकाणी आवर्जून उल्लेख करायला हवा. त्या सुद्धा मोकळ्या मनाने जयभीम म्हणतात. बौद्ध धम्माचा स्वीकार केला असल्याने विचारवंत रुपाताई कुलकर्णी (नागपूर) जयभीम आत्मीयतेने नि आदराने म्हणतात. तिच बाब कविवर्य सुरेश भट यांची. त्यांनीही बौद्ध धम्म स्वीकारला होता. सुप्रसिद्ध दिग्दर्शक नागराज मंजुळे हे सुद्धा फार आदराने जयभीम म्हणताना दिसतात. मुंबई विद्यापीठातले प्रा. डॉ. नारायण भोसले हे देखील याच मंदियाळीतले. प्रख्यात लेखक प्रदीप गोखले सुद्धा याच श्रेणीत मोडतात. अलीकडेच जग सोडून गेलेल्या समाजशास्त्रज्ञ गेल ओम्वेट आंबेडकरवादी विचारवंत असल्याने साहजिकच त्याही जयभीम म्हणायच्या. त्यांचे जीवनसाथी भारत पाटणकर सुद्धा. सत्यशोधक चळवळीतले कार्यकर्ते किशोर ढमाले आणि प्रा. प्रतिमा परदेशी, मराठीचे प्राध्यापक नि कार्यकर्ते अशोक राणा, सुगावा प्रकाशनाच्या उषाताई वाघ, समाजवादी चळवळीतले कार्यकर्ते शेखर सोनाळकर (जळगाव), औरंगाबादच्या सामाजिक कार्यकर्त्या मंगला खिवंसरा आणि थोर विचारवंत आ.ह. साळुंके हे सारे जयभीम म्हणणारेच!
माझे जळगाव विद्यापीठातले निवृत्त सहकारी सुनील पाठक देखील अगदी सहजतेने जयभीम म्हणत असतात. यात अजून एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे. खरं म्हणजे ज्यांना डॉ. आंबेडकरांविषयी आदर आहे अशा प्रत्येक व्यक्तीने कोणाशीही संवाद साधताना जयभीम म्हणायला हरकत नाही. शिवाय भारतीय स्त्रियांनी सुद्धा असाच कित्ता गिरवायला हवा. मग त्या स्त्रिया कोणत्याही जाती-धर्माच्या असो, त्यांच्यासाठी आंबेडकरांनी जे उत्तुंग काम केलं आहे त्याविषयी कृतज्ञता म्हणून त्या असं नक्की केलं पाहिजे. अलीकडे काही महाविद्यालयीन शिक्षण घेणारे मुस्लीम विद्यार्थी देखील जयभीम म्हणत असल्याचे माझ्या प्राध्यापक मित्राने सांगितलं आहे. अलीकडे बरेच सामाजिक कार्यकर्ते जयज्योती- जयभीम-जयशिवराय असं अभिवादन करताना दिसतात. हा एक सकारात्मक बदल म्हणता येईल.
दक्षिण भारतातील दलित समाज सुद्धा जयभीम म्हणताना दिसतो. जयभीम हे अभिवादन समताधिष्टीत समाजाच्या निर्मितीचा ध्यास असणाऱ्या प्रत्येकाने मग ती व्यक्ती स्त्री असो वा पुरुष अथवा इतरलिंगी. प्रख्यात कार्यकर्त्या नि कवयत्री दिशा शेख या सुद्धा जयभीमचा उच्चार अभिमनाने नि आनंदाने करतात. जयभीम या चित्रपटामुळे हा शब्द समाजातल्या सर्व विवेकशील- विचारी- परिवर्तनवादी- उदारमतवादी- स्त्रीवादी-लोकशाहीवादी-समतावादी समूहामध्ये आदराने आणि अभिमानाने उच्चारला जाईल अशी स्थिती लवकर येओ, अशी आशा करु या ! जयभीम !!
( हा लेख लिहिताना माझे जळगाव येथील मित्र आणि इतिहासाचे प्राध्यापक देवेंद्र इंगळे आणि प्रा. अजय अहिर, पुणे यांच्यासमवेत झालेली चर्चा फलदायी ठरली. )
प्रा. डॉ. प्रवीण घोडेस्वार
सहयोगी प्राध्यापक,
मानव्यविद्या व सामाजिक शास्त्रे विद्याशाखा,
यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ,
नाशिक
मोबाईल : ९४०३७७४५३०