नवी दिल्ली वृत्तसंस्था | New Delhi
खलिस्तान जिंदाबाद फोर्स या दहशतवादी संघटनेने प्रयागराज महाकुंभ मेळ्यात १९ जानेवारीला लागलेल्या आगीची जबाबदारी स्वीकारली आहे. त्यानंतर खलिस्तान जिंदाबाद फोर्स (KZF)या दहशतवादी संघटनेने जबाबदारी स्वीकारली आहे. संघटनेने याबाबत काही माध्यम संस्थांना ई-मेल पाठवला आहे, ज्यामध्ये हा पिलीभीत बनावट चकमकीचा बदला असल्याचे म्हटले आहे. हा स्फोट म्हणजे सीएम योगींना दिलेला इशाराच आहे. ही सुरुवात आहे, असे म्हटले आहे.
प्रयागराज येथे महाकुंभमेळा सुरु आहे. या ठिकाणी लाखोंनी भाविक येतात. रविवारी महाकुंभ मेळ्यामध्ये आग लागली होती. सेक्टर १९ – २०मध्ये ही आग लागल्याची माहिती आहे. विवेकानंद सेवा समिती वाराणसीच्या टेंटमध्ये स्वयंपाक करताना आग लागल्याची माहिती आहे. मात्र, याची अधिकृत माहिती समोर आलेली नाही. एका पाठोपाठ सिलिंडरचा स्फोट झाल्यामुळे ही आग पसरत गेली आणि आगीने विक्राळ रूप धारण केले होते. या आगीमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. मात्र, सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही.
KZF ने काय म्हंटले?
KZF ने मंगळवारी माध्यम संस्थांना एक ई-मेल पाठवून दावा केला की हा पिलीभीत चकमकीचा बदला आहे. २३ डिसेंबर रोजी पीलीभीत चकमक झाली होती. यूपी पोलिसांनी ३ खलिस्तानी दहशतवाद्यांचा खात्मा केला होता. मात्र, यूपी पोलिसांनी खलिस्तान जिंदाबाद फोर्सचा दावा फेटाळून लावला आहे. दुसरीकडे पंजाब पोलिसांचे विशेष डीजीपी (अंतर्गत सुरक्षा) आरएन ढोके यांनी ही घटना उत्तर प्रदेशातील असल्याचे सांगितले. यामुळे त्यांनी या प्रकरणावर काहीही भाष्य करणे योग्य नाही असे म्हंटले.
दहशतवादी संघटनेने कॅनडा आणि पंजाबमधील पत्रकारांना ई-मेल पाठवला आहे. ‘खलिस्तान झिंदाबाद फोर्सने म्हटले की, कोणाचेही नुकसान करणे हा मुख्य उद्देश नव्हता. यूपीच्या मुख्यमंत्र्यांसाठी हा केवळ इशारा आहे. ही तर सुरुवात आहे. ई-मेलमध्ये फतेह सिंग बागीचे नाव लिहिले आहे.चकमकीत सहभागी खलिस्तानी दहशतवाद्यांचा हस्तक फतेह सिंग बागी हा तरणतारनचा रहिवासी आहे.
काय आहे घटना?
प्रयागराजच्या सेक्टर १९-२० मध्ये शास्त्री पुल आणि रेल्वे पुल दरम्यान ही आग लागली होती. हा पूर्ण भाग महाकुंभ क्षेत्रामध्ये येतो. टेंटमध्ये ठेवलेल्या सिलेंडर्सचे एकापाठोपाठ एक स्फोट झाले, त्यामुळे आगीने विक्राळ रुप धारण केले. सिलेंडर ब्लास्टमुळे आग वेगाने पसरली. आगीच्या या घटनेमुळे संपूर्ण परिसरात एकच घबराट, गोंधळाची स्थिती निर्माण झाली.
अग्निशमन दलाच्या सहा गाड्या या आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न करत होत्या. पोलीस आणि एनडीआरएफच्या टीम्सनी आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी आसपासचा परिसर रिकामा केला. या घटनेत सुदैवाने कोणतीही जिवीतहानी झाली नाही. जोरात वाहणाऱ्या वाऱ्यामुळे ही आग पसरली. आगीवर नियंत्रण मिळवल्याचा सांगितले होते. अफवांकडे लक्ष देऊ नका असही म्हटले होते. ही आग कशी लागली? आणि इतके विक्राळ रुप कसे धारण केले? हे प्रशासनाने त्यावेळी स्पष्ट केले नव्हते.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा