अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
2005 पूर्वीची भरती जाहिरात असणार्या मात्र 2005 नंतर सेवेत आलेल्या जिल्ह्यातील 372 प्राथमिक शिक्षकांना सरकारच्या आदेशानूसार जुनी पेन्शन योजना लागू करण्याचा निर्णय जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर यांनी घेतला आहे. ग्रामविकास विभागात काम करणार्या सर्व संवर्गात जुनी पेन्शन मंजूर करून घेण्यात शिक्षक संवर्ग नंबर वन ठरला असून या निर्णयामुळे 2005 च्या पूर्वी सेवेत आलेल्या इतर संवर्गाचा जुन्या पेन्शनचा मार्ग मोकळा झाला आहे. राज्य सरकारने 2005 पूर्वी सेवेत दाखल झालेल्या अथवा 2005 च्या भरतीच्या जाहिरातीनूसार अर्ज करून 2005 नंतर सेवेत दाखल झालेल्या सर्व कर्मचार्यांना जुनी पेन्शन लागू करण्याचे आदेश राज्य सरकारच्या वतीने देण्यात आले होते.
याबाबत ग्रामविकास विभागाने स्वतंत्र आदेश काढत जिल्हा परिषदे कर्मचार्यांसाठी स्वतंत्रपणे कार्यवाही करण्याचे आदेश जिल्हा परिषद प्रशासनाला दिले होते. त्यानूसार जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी येरेकर यांनी सर्वप्रथम जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षकांचा हा विषय निकाली काढण्याचा निर्णय घेतला. जिल्ह्यात 1 नोव्हेंबर 2005 पूर्वी भरतीची जाहिरात निघालेल्या मात्र, 2005 नंतर सेवेत दाखल झालेल्या मराठी माध्यमातील 264, उर्दु माध्यमातील 9 शिक्षक व आंतरजिल्हा बदलीने आलेल्या 99 अशा 372 शिक्षकांना शासनाच्या आदेशानूसार जुनी पेन्शन योजना लागू करण्याचा निर्णय मुख्य कार्यकारी अधिकारी येरेकर यांनी घेतला आहे. सरकारच्या जुन्या पेन्शनबाबत निर्णय घेणारी नगर जिल्हा परिषद ही राज्यातील बहुदा पहिली जिल्हा परिषद ठरणार असून यातही येरेकर यांनी शिक्षकाचा जुन्या पेन्शनचा विषय सर्व प्रथम मार्गी लावला आहे. आता जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या अन्य संवर्गातील कर्मचार्यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्याबाबत कार्यवाही सुरू करण्यात आल्याची माहिती सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी राहुल शेळके यांनी दिली.