Tuesday, September 17, 2024
Homeनगरप्राथमिक शिक्षकांच्या बदल्यांचे सुधारित आदेश

प्राथमिक शिक्षकांच्या बदल्यांचे सुधारित आदेश

बदली प्रक्रिया वेळापत्रकाबाबत संभ्रम, सरकारकडून शिळ्या कढीला उत आणल्याचा आरोप

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

- Advertisement -

प्राथमिक शिक्षकांच्या जिव्हाळ्याचा विषय असणार्‍या बदल्याबाबत सुधारित शासन निर्णय मंगळवार (दि.18) राज्य पातळीवरून निघाले आहेत. हा आदेश सुधारित असल्याचे ग्रामविकास विभागाच्यावतीने सांगण्यात येत असले तरी या सुधारित आदेशात नव्याने काहीही महत्वपूर्ण बदल करण्यात आलेले नाहीत. हा प्रकार म्हणजे शिळ्या कढीला उत आणण्याचा प्रकार असल्याची प्रतिक्रिया प्राथमिक शिक्षकांच्या वर्तुळात उमटली आहे. दरम्यान, या सुधारित आदेशात गुरूजींच्या बदल्या 1 ते 31 मे या कालावधीत पूर्ण करण्यास सुचवले असले तरी यंदाच्या शिक्षकांच्या बदल्या कराव्यात की नाही आणि करावयाच्या असल्यास, त्या कधी कराव्यात याबाबत स्पष्टता नसल्याने यंदा बदल्या होणार की नाही, याबाबत संभ्रम अवस्था आहे.

जिल्हा परिषदेत सर्वात मोठा विभाग हा प्राथमिक शिक्षण विभाग असून दरवर्षी जिल्ह्यात या विभागात शेकडोच्या संख्येत शिक्षकांच्या बदल्या होत असतात. यंदा आधी लोकसभा निवडणूक आणि त्यानंतर शिक्षक मतदारसंघ निवडणुकीच्या आचारसंहिता असल्याने गुरूजींच्या बदल्या झालेल्या नाहीत. यंदा जिल्ह्यात कार्यतर 11 हजार 500 हून अधिक गुरूजींपैकी 3 हजार 500 शिक्षकांनी बदलीसाठी अर्ज केलेले आहेत. यात विनंती, आपसी यासह अन्य संवर्गातील पात्र शिक्षकांचा समावेश आहे. यंदा शिक्षकांच्या बदल्याबाबत ग्रामविभागाकडून कोणत्याही सुचना नव्हत्या. मात्र, मंगळवारी ग्रामविकास विभागाने शिक्षकांच्या बदल्याचा सुधारित 25 पानाचा शासन निर्णय राज्य सरकारच्या संकेत स्थळावर प्रसिध्द केलेला आहे. मात्र, या शाससन निर्णयात शिक्षकांचे बदली प्रक्रियेचे वेळापत्र वगळता अन्य सर्व बाबींचा समावेश आहे.

ग्रामविकास विभागाच्यावतीने गुरूजींच्या बदल्याबाबत स्पष्ट निर्देश नसल्याने प्राथमिक शिक्षण विभागासह सामान्य प्रशासन विभागात देखील बुचकळ्यात आहे. दुसरीकडे येत्या 5 जुलैपर्यंत शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीची आचारसंहिता संपणार असून त्यानंतर बदल्याबाबत निर्णय होण्याची शक्यता आहे. मात्र, ग्रामविकास विभागाने यंदा बदल्या कराव्यात की नाही, याबाबत स्पष्ट धोरण सांगितले नसल्याने यंदाच्या गुरूजींच्या बदल्याचा विषय आता मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या कोर्टात पोहचणार आहे. तेच याबाबत योग्य धोरण घेणार असल्याचे जिल्हा परिषदेच्या सुत्रांकडून सांगण्यात आले. दरम्यान, काल आलेल्या नवीन शासन निर्णयात 2022 ची बदली प्रक्रिया झाल्यानंतर राज्यातील शिक्षक संघटनांनी घेतलेले आक्षेप- सुचना, न्यायालयात गेलेली प्रकरणे आणि यातून समोर आलेल मुद्दे यावर अभ्यास करण्यासाठी अभ्यास गट नेमण्यात आला होता.

त्या अभ्यासगटानूसार काही बदल करण्यात आले असल्याचे शासन निर्णयात नमुद करण्यात आलेले आहे. यात अवघड क्षेत्र, सर्वसाधारण क्षेत्रातील बदल्या, बदली पात्र आणि बदली अधिकार प्राप्त शिक्षक, बदली प्रक्रियतून वगळणारे शिक्षक, विशेष संवर्गातील शिक्षक यांच्या बदल्यांबाबत मार्गदर्शन करण्यात आले आहे. यासह बदली प्रक्रियेत सहभागी होणार्‍या कर्मचार्‍यांचे प्रशिक्षण, शाळानिहाय रिक्त जागांची घोषणा, शिक्षकांकडून बदलीचा पसंतीक्रम, बदली प्रक्रियेची कार्यपध्दती आणि अन्य धोरणाबाबत जिल्हा परिषदांना सुचना करण्यात आल्या आहेत. या आदेशात आणि आधीच्या आदेशा फारसे नावीन्य नसल्याचा दावा शिक्षक संघटनांच्या नेत्यांनी शिक्षकांच्या वर्तुळातून सांगण्यात आले. महत्वाचे म्हणजे या बदल्यांसाठी वेळापत्रक नसल्याने बदल्याची प्रक्रिया कधी होणार असा प्रश्न उपस्थित करण्यात आला आहे.

यंदा मोठ्या संख्याने बदल्यांसाठी शिक्षकांकडून अर्ज आलेले आहेत. यंदाच्या अर्जाची संख्या 3 हजार 500 च्या जवळपास असल्याने बदली केलेल्या सर्व शिक्षकांच्या जागा रिक्त दाखवण्याच्या मानसिकतेमध्ये प्रशासन आहे. तसेच झाल्यास बदलीसाठी अर्ज केलेल्या पैकी 3 हजार शिक्षक बदलीमधून माघार घेतील, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले. आलेल्या अर्जानूसार सर्व जागा रिक्त दाखवल्यास मोठी खळबळ होण्याची शक्यता असल्याने यंदा बदल्या कधी आणि कशा होणार याकडे जिल्ह्याचे लक्ष राहणार आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या