Tuesday, February 3, 2026
Homeराजकीयपृथ्वीराज चव्हाण यांचे ऑपरेशन सिंदूरवर वादग्रस्त विधान; म्हणाले, पहिल्या दिवशीच…

पृथ्वीराज चव्हाण यांचे ऑपरेशन सिंदूरवर वादग्रस्त विधान; म्हणाले, पहिल्या दिवशीच…

मुंबई । Mumbai

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी आपल्या ताज्या वक्तव्यांनी देशाच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडवून दिली आहे. येत्या १९ डिसेंबरला अमेरिकेतून काही अत्यंत महत्त्वाची आणि गोपनीय कागदपत्रे सार्वजनिक होणार असून, त्याचा थेट परिणाम भारताच्या राजकारणावर होईल, असा दावा त्यांनी केला आहे. विशेष म्हणजे, या घडामोडींनंतर देशाच्या पंतप्रधानपदी एका ‘मराठी’ व्यक्तीची वर्णी लागेल, असे भाकीतही त्यांनी वर्तवले आहे.

- Advertisement -

पृथ्वीराज चव्हाण यांनी गेल्या महिन्याभरात दुसऱ्यांदा हा खळबळजनक दावा केला आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, १९ डिसेंबर रोजी अमेरिकेत काही अशी कागदपत्रे प्रसिद्ध केली जातील, ज्यामुळे जगभरातील अनेक बड्या नेत्यांचे धाबे दणाणणार आहेत. हे एका मोठ्या स्टिंग ऑपरेशनचा भाग असल्याचे त्यांनी सूचित केले आहे. या कागदपत्रांमुळे जागतिक स्तरावर खळबळ उडेल आणि भारताच्या सध्याच्या नेतृत्वावरही त्याचे गंभीर पडसाद उमटतील. याच पार्श्वभूमीवर त्यांनी देशात नेतृत्वबदल होऊन एक मराठी माणूस पंतप्रधान होईल, असे सूचक विधान केले आहे.

YouTube video player

पुण्यात प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना पृथ्वीराज चव्हाण यांनी ‘ऑपरेशन सिंदूर’ संदर्भात केलेल्या विधानामुळे नवीन वादाला तोंड फुटले आहे. ७ तारखेला झालेल्या अवघ्या अर्ध्या तासाच्या हवाई युद्धात आपला पूर्णपणे पराभव झाला होता, असा धक्कादायक दावा त्यांनी केला आहे. “लोक यावर विश्वास ठेवतील की नाही हे माहित नाही, पण त्या युद्धात भारतीय विमाने पाडण्यात आली होती. परिणामी, आपली सर्व युद्धविमाने जमिनीवरच होती आणि एकही विमान उड्डाण करू शकले नाही,” असे ते म्हणाले.

चव्हाण यांनी पुढे असेही नमूद केले की, जर ग्वाल्हेर, भटिंडा किंवा सिरसा यांसारख्या महत्त्वाच्या तळांवरून भारतीय विमानांनी उड्डाण केले असते, तर पाकिस्तानकडून ती पाडली जाण्याची दाट शक्यता होती. याच भीतीपोटी हवाई दलाची सर्व विमाने धावपट्टीवरच थांबवून ठेवण्यात आली होती, असा दावा त्यांनी केला आहे. ‘ऑपरेशन सिंदूर’च्या अनुभवावरून पृथ्वीराज चव्हाण यांनी देशाच्या संरक्षण धोरणावरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. त्यांच्या मते, या मोहिमेदरम्यान भारतीय सैन्य एक किलोमीटरही पुढे सरकले नव्हते. जे काही युद्ध झाले ते केवळ दोन-तीन दिवसांचे हवाई आणि क्षेपणास्त्र युद्ध होते. भविष्यातील युद्धे देखील अशाच प्रकारे तंत्रज्ञानावर आधारित असतील, असे त्यांनी स्पष्ट केले.

या पार्श्वभूमीवर, “आपल्याला खरोखरच १२ लाख सैनिकांच्या अवाढव्य फौजेची गरज आहे का?” असा सवाल त्यांनी केला आहे. आधुनिक युद्धतंत्राचा विचार करता, आपण सैनिकांचा वापर इतर विधायक कामांसाठी करू शकतो का, यावर गांभीर्याने विचार करण्याची गरज असल्याचे त्यांनी प्रतिपादन केले. पृथ्वीराज चव्हाण यांच्या या विधानांमुळे राजकीय वर्तुळात संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत. एकीकडे त्यांच्या ‘मराठी पंतप्रधान’ या दाव्याची चर्चा होत असताना, दुसरीकडे भारतीय सैन्यदल आणि हवाई दलाच्या क्षमतेवर त्यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांमुळे त्यांच्यावर टीकाही होण्याची शक्यता आहे. १९ डिसेंबरला नेमके काय घडते, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

ताज्या बातम्या

धुरंधर

Dhurandhar 2: जबरदस्त ॲक्शन, रक्तरंजित थरार, “ये नया हिंदुस्थान” है म्हणत...

0
मुंबई | Mumbaiसगळ्यांना ज्याची प्रतीक्षा होती त्या धुरंधर फिल्मच्यी सीक्वेलचा टिझर अखेर आला आहे. आज मंगळवार 3 फेब्रुवारी रोजी, रणवीर सिंहने चित्रपटाचे पहिले पोस्टर...