अहिल्यानगर (प्रतिनिधी)
जिल्हा परिषदेसह अन्य मान्यता प्राप्त सरकारी शाळांमध्ये खासगी शिक्षण संस्थांमार्फत आयोजित स्पर्धा परीक्षांना उत आला आहे. विशेष म्हणजे, या संस्थांकडून परीक्षांच्या नावाखाली परीक्षा शुल्क, मार्गदर्शन शुल्क आणि पुस्तक शुल्काच्या नावाखाली विद्यार्थी व पालकांची लूट सुरू असून याकडे सर्वांचे दुर्लक्ष झाल्याचे दिसत आहे.
एकीकडे जिल्हा परिषदेच्या शाळांसह सरकारी शाळांमधील शिक्षणाचा दर्जा वाढावा, यासाठी ‘मिशन आरंभ’ सारखा राबवण्यात येणाऱ्या महत्वपूर्ण उपक्रमाला विरोध करणारे शिक्षक मात्र, खासगी सशुल्क स्पर्धा परीक्षा घेणाऱ्यांना पायघड्या घालताना दिसत आहेत. जिल्ह्यात शिक्षक संघटनांच्या माध्यमातून साखळी पद्धतीने खासगी स्पर्धा परीक्षांच्या नावाखाली अर्थकारणाचा गोरखधंदा सुरू असल्याची माहिती समोर आली आहे.
काही वर्षांपूर्वी नगर जिल्हा परिषद शिक्षण विभागाने जिल्ह्यात शिष्यवृत्ती आणि शासनाकडून मान्यता मिळालेल्या परीक्षा वगळता अन्य कोणत्याही परीक्षांना विद्यार्थ्यांना बसवू नयेत, असा निर्णय घेतलेला असताना त्याकडे त्याकडे दुर्लक्ष करत नगर जिल्ह्यात सध्या खासगी संस्थांनी स्पर्धा परीक्षांच्या नावाखाली बाजार मांडल्याचे दिसत आहे. यासाठी प्रत्येक तालुक्यातील काही शिक्षक आणि संघटनांना या खासगी परीक्षा घेणाऱ्या संस्थांनी हाताशी धरले असून त्यांना विविध आमिष दाखवण्यात आले आहेत.
यातून शिक्षकांचा व्हॉटसअप ग्रुप तयार करण्यात आला असून त्यावर संबंधीत खासगी शिक्षण संस्थांच्या परीक्षेची पत्रक, विद्यार्थ्यांची यादीसाठी एक्सएलशिट, स्पर्धा परीक्षेची माहिती, त्यासाठी इयत्तानिहाय विद्यार्थ्यांना आकारण्यात येणारा परीक्षा शुल्क, मार्गदर्शन शुल्क आणि पुस्तिका संच यासाठी येणारा शुल्क यांचे स्वतंत्र दरपत्रके पाठवण्यात येत आहेत. ज्या प्रमाणे हॉटेलमध्ये जेवणाचे दरपत्रक आहे, त्याच धर्तीवर या खासगी संस्थांनी त्यांचे दरपत्रक तयार केले असल्याचे प्रथमदर्शनी दिसत आहे. या परीक्षांसाठी शिक्षण विभागाची परवानगी घेतली की नाही, शिक्षण विभागाने ती दिलेली आहे की नाही, तालुकास्तरावर गटशिक्षणाधिकारी, केंद्र पातळीवर केंद्र संचालक यांना याबाबत कल्पना आहे की नाही, याचा तपशील तपासण्याचा प्रयत्न केला असता, अनेकांनी कानावर हात ठवले. नगर जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या साडेतीन हजार तर अन्य शासन मान्य व्यवस्थापनाच्या मिळून साडेपाच हजारांहून अधिक शाळा आहेत. यातील किती शाळांमध्ये या खासगी संस्थांनी स्पर्धा परीक्षेच्या नावाखाली शिरकाव केला. संबंधीत संस्थांनी यातून विद्यार्थ्यांकडून किती शुल्क जमा केला, याची आकडेवारी शोधण्याचा प्रयत्न केला प्रशासकीय यंत्रणाकडून प्रतिसाद मिळाला नाही.
प्रत्येक तालुक्यातील शाळांचा सहभाग
मिळालेल्या माहितीनुसार, शिक्षण विभागाने एखाद्या दुसऱ्या खासगी शिक्षण संस्थेला स्पर्धा परीक्षा घेण्यास परवानगी दिलेली आहे. मात्र, त्यांनी किती शुल्क आकारावे याबाबत स्पष्टता नाही. यामुळे अनेक ठिकाणी अन्य खासगी शिक्षण संस्थांनी देखील त्यांच्या वतीने स्पर्धा परीक्षांचे आयोजन केलेले आहे. या परीक्षेमध्ये यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांना जुजबी बक्षीस देण्याचे जाहीर करण्यात आलेले आहे. सरकारी शाळांमधील विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढावी, या नावाखाली अनेकांनी परीक्षांच्या नावावर बाजार मांडलेला आहे. जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील शाळांचा यात सहभाग असल्याचे सांगण्यात आले आहे.
काही शिक्षकांचा विरोधासाठी विरोध
जिल्हा परिषदेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांचा शिष्यवृत्ती परीक्षेत सहभाग कमी झाला. यामुळे शासनाने पाचवी व आठवी इयत्तेसाठी असणारी शिष्यवृत्तीची परीक्षा पूर्वीप्रमाणे चौथी आणि सातवीसाठी करण्याचा निर्णय घेतला. जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये आठवी आणि पाचवीचे वर्ग कमी असल्याने शिष्यवृत्तीमधील विद्यार्थ्यांचा सहभाग कमी झाल्याचे दिसून आले. यामुळे शिक्षण विभागाने आपला निर्णय बदलला. मात्र, अनेक शिक्षक व नेत्यांचा मूळतः शिष्यवृत्ती आणि शासनाच्या परीक्षांना विरोध आहे. आपण काही करणार नाही, दुसऱ्याला काही करून द्यायचे नाही, असे धोरण असल्याने त्यांनी आता विरोधासाठी विरोध म्हणून शिष्यवृत्तीसह खाजगी स्पर्धा परीक्षांना देखील विरोध केला असल्याची वस्तूस्थिती आहे. मात्र, असे असतानाही खासगी परीक्षा घेणाऱ्याचे आवाच्या सव्वा शुल्क पाहिल्यानंतर त्यांचा देखील शुद्ध नसल्याचे काही शिक्षकांनी सांगितले.
साखळी पद्धतीने परीक्षेचे काम
सरकारी शाळांमध्ये खासगी शिक्षण संस्थांच्या स्पर्धा परीक्षा घेण्यासाठी तालुकानिहाय साखळी पद्धतीने शिक्षकांची निवड करण्यात आलेली आहे. हे शिक्षक एकमेकांच्या संबंधातील अथवा एकाच संघटनेतील असल्यास त्यांना प्राधान्य देऊन त्यांच्यावर विद्यार्थी निवड आणि त्यांच्याकडून शुल्क वसुलीची जबाबदारी सोपवण्यात आलेली आहे. नेमणूक झालेल्या या शिक्षकांनी पालकांना विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेसाठी या खासगी स्पर्धा परीक्षा किती गरजेच्या आहेत, याचे महत्त्व पटवून देताना दिसत आहेत.




