Saturday, May 25, 2024
Homeनगरव्यावसायिकासह भाच्याला मारहाण करत लुटले

व्यावसायिकासह भाच्याला मारहाण करत लुटले

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

सहा जणांच्या टोळक्यांनी व्यावसायिकासह भाच्याला लोखंडी रॉड, दांडक्याने मारहाण करून दोन लाख 25 हजाराची रोकड, मोबाईल, कागदपत्रे असा दोन लाख 35 हजारांचा ऐवज लुटला. सोमवारी (दि. 31) सायंकाळी सहाच्या सुमारास सारसनगरमधील कर्पे विटभट्टीजवळ ही घटना घडली. मारहाणीत व्यावसायिक अफताब नवाब बागवान (वय 34) व त्यांचा भाचा अरबाज इब्राहिम बागवान (दोघे रा. हातमपुरा, नगर) जखमी झाले आहेत. त्यांच्यावर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

- Advertisement -

उपचारादरम्यान अफताब बागवान यांनी कोतवाली पोलिसांना दिलेल्या जबाबावरून अवि जायभाये, सुमित साळवे ऊर्फ भाईजी, ऋषिकेश बडे, मुनिर सय्यद व दोन अनोळखी (सर्व रा. नगर, पूर्ण नावे, पत्ता माहिती नाही) यांच्या विरूध्द मंगळवारी (दि. 31) पहाटे दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अफताब बागवान हे कोल्ड्रिंक्सचा व्यावसाय करतात. ते त्यांच्या टेम्पोमध्ये माल भरून भाचा अरबाज सोबत पुणे येथे डिलीव्हरी देण्याकरिता गेले होते. पुणे येथे कोल्ड्रिंक्सची डिलीवरी देऊन त्याचे दोन लाख 25 हजार रुपये घेऊन ते परत नगरमध्ये आले. ते त्यांच्या गोडाऊनकडे जात असताना कर्पे विटभट्टीजवळ अवि जायभाये याने बागवान यांच्याकडे पाण्याची बाटली मागितली.

आमच्याकडे पाण्याची बाटली नाही, असे बागवान यांनी सांगताच जायभाये याने त्यांना मारहाण केली. त्यांच्या सोबत असलेल्या इतरांनीही बागवान यांच्यासह त्यांचा भाचा अरबाज यांना लोखंडी रॉड, दांडक्याने मारहाण करून टेम्पोमधील दोन लाख 25 हजारांची रोकड, मोबाईल व कागदपत्रे बळजबरीने लुटले. टेम्पोवर दगड मारून नुकसान केले व जिवे मारण्याची धमकी दिली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. अधिक तपास महिला पोलीस उपनिरीक्षक मोरे करीत आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या