अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
सावेडी परिसरातील विराज कॉलनी येथे अज्ञात चोरट्यांनी मागील दरवाजाचे लॉक तोडून घरफोडी करत सोने, चांदी, डायमंडचे दागिने व सात लाखांची रोकड असा एकुण 14 लाख 75 हजार रूपयांचा मुद्देमाल लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरूध्द बुधवारी (17 डिसेंबर) घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
व्यावसायिक अशोककुमार विजयकुमार अग्रवाल (वय 50) यांनी फिर्याद दिली आहे. अशोककुमार हे कुटुंबासह सावेडीतील विराज कॉलनी, बंगला क्रमांक 06 येथे वास्तव्यास आहेत. 13 डिसेंबर रोजी सायंकाळी 6 वाजता जयपूर येथे नातेवाईकांच्या कार्यक्रमासाठी ते कुटुंबासह गेले होते. घराचे सर्व दरवाजे कुलूप लावून बंद करण्यात आले होते. दरम्यान, 16 डिसेंबर रोजी दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास शेजारी राहणारे विनोद सुरपुरीया यांना घरात काम करणार्या पार्वती वाडेकर यांनी घराचा मागील दरवाजा उघडा असल्याची माहिती दिली. यानंतर घरात जाऊन पाहणी केली असता बेडरूममधील सामान अस्ताव्यस्त असल्याचे आढळून आले. याची माहिती मिळताच अशोककुमार यांनी 17 डिसेंबर रोजी पहाटे 3 वाजता जयपूरहून अहिल्यानगर गाठले. त्यांनी पाहणी केली असता घरातील दोन्ही बेडरूममधील कपाटे उघडी व लॉकर तुटलेले आढळले.
त्यामधील सोन्या-चांदीचे व डायमंडचे दागिने, रोख रक्कम तसेच सीसीटीव्हीचा डीव्हीआर हार्डडिस्क चोरीस गेल्याचे निष्पन्न झाले. चोरी गेलेल्या मुद्देमालामध्ये सोन्याच्या अंगठ्या, चैन, मंगळसूत्र, हार, ब्रेसलेट, कडे, गिनी कॉईन, कानातील व नाकातील सोन्याचे दागिने, डायमंड पेंडंट, चांदीची भांडी व नाणी, महागडे घड्याळ, 7 लाख रूपयांची रोख रक्कम असा एकूण 14 लाख 75 हजार रूपयांचा मुद्देमाल समाविष्ट आहे.
घटनेची माहिती मिळताच तोफखाना पोलिसांनी फिंगरप्रिंट विभाग व श्वान पथकाला पाचारण करून तपास केला. चोरट्यांनी सीसीटीव्ही डीव्हीआरची हार्डडिस्क चोरून नेल्याने तपासात अडथळा निर्माण झाला आहे. या प्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरूध्द घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. सावेडी परिसरात वाढत्या घरफोड्यांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलीस अधिक तपास करीत आहेत.




