अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
शहरातील साईनगर, बुरूडगाव रस्ता येथे 22 मार्च रोजी पहाटे चार अज्ञात इसमांनी जबरी चोरी करण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी व्यावसायिक योगेश श्रीकांत चंगेडीया (वय 45) यांनी 24 मार्च रोजी कोतवाली पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून चार अनोळखीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
चंगेडीया आपल्या कुटुंबासोबत प्लॉट क्रमांक 95, साईनगर येथे राहतात. 21 मार्चच्या रात्री कुटुंबीय जेवण करून झोपी गेले असताना, 22 मार्चच्या पहाटे 2.45 वाजण्याच्या सुमारास त्यांच्या पत्नीला घराच्या कंपाउंडमधून आवाज ऐकू आला. त्यांनी पतीला जागे केले आणि सीसीटीव्ही फुटेज तपासले असता दोन अनोळखी इसम मास्क लावून घराच्या आवारात फिरताना दिसले. फिर्यादी चंगेडीया यांनी खाली झोपलेल्या त्यांच्या आईला फोन करून दरवाजा व्यवस्थित लॉक करण्यास सांगितले. तसेच, समोरील रहिवासी अतुल शेटीया यांनाही फोन करून मदतीसाठी बोलावले. शेटीया यांनी आपल्या गॅलरीत येऊन मोठ्याने आरडाओरडा केला असता, संशयित चार इसम पळून गेले.
यानंतर चंगेडीया यांनी पोलिसांना फोन करून माहिती दिली. घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिसांनी परिसराची पाहणी केली असता, विनायकनगर रस्त्यावर एक चारचाकी कार आढळून आली. कारला नंबर प्लेट नव्हती आणि दरवाजे उघडे होते. आत पाहणी केली असता धारदार लोखंडी हत्यारे आढळून आली. त्याचप्रमाणे चंगेडीया यांच्या घराच्या खिडकीचे शटर उचकटलेले आढळले आणि कंपाउंडजवळ एक लोखंडी कटर देखील सापडला असल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. पुढील तपास महिला पोलीस उपनिरीक्षक शितल मुगडे करत आहेत.