अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
बकरे विक्रीचा व्यवसाय करणार्या तरुणावर चार तरुणांनी सत्तूर, चाकू व लाकडी दांडक्यांनी हल्ला करून मारहाण केल्याची घटना सोमवारी (दि. 12 मे) सायंकाळी सातच्या सुमारास कसाईगल्ली, शनिचौक येथे घडली. ताहिर शेख अब्दुल कादर (वय 41, रा. पंचपीर चावडी, कबाड गल्ली, अहिल्यानगर) असे मारहाण झालेल्या तरुणाचे नाव असून त्यांच्यावर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
त्यांनी दिलेल्या जबाबावरून मंगळवारी (13 मे) कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सकलेन आसिफ वस्ताद, साहिल आसिफ वस्ताद, मतीन अब्दुल वस्ताद व उनेस आबिद वस्ताद यांच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ताहिर शेख हे शनि चौक येथील शौकत पटेल यांच्या बिल्डिंग खाली उभे असताना त्यांच्या ओळखीचे सकलेन, साहिल, मतीन व उनेस हे चौघे तेथे आले.
दुकानाच्या पाटीवरून सुरू झालेल्या वादातून त्यांनी ताहिर यांना आधी शिवीगाळ केली. त्यानंतर सकलेनने सत्तूरने, साहिलने चाकूने तर मतीन व उनेस यांनी लाकडी दांडक्याने ताहिर यांना मारहाण केली. या मारहाणीत ताहिर जखमी झाले आहेत. तू आमच्याशी नडला तर तुझा कांड करून टाकू, अशी धमकीही या चौघांनी दिली असल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. पोलीस अधिक तपास करीत आहेत.