अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
शहरातील रेल्वे स्टेशन रोडवरील लोखंडी पुलाजवळ प्राध्यापकावर लुटमारीच्या उद्देशाने करण्यात आलेल्या चाकू हल्ल्याप्रकरणी दोन संशयित आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे. तर एक संशयित आरोपी अद्यापही पसार असून, पोलिस त्याच्या मागावर आहेत. गुन्ह्यात वापरलेली 90 हजार रुपये किंमतीची मोपेड देखील जप्त करण्यात आली आहे.
निखील विकास बोरकर (रा. पुसद, जि. यवतमाळ) हे 6 मे रोजी पहाटे सुमारास श्वासोच्छवासास त्रास होऊ लागल्याने घराबाहेर पडले होते. रेल्वे स्टेशन रोडवरील लोखंडी पुलावरून जात असताना तीन अज्ञात इसम मोपेडवरून आले आणि त्यांनी त्यांना अडवले. खिसे तपासूनही काहीही न मिळाल्यामुळे त्यांनी बोरकर यांचा मोबाईल हिसकावण्याचा प्रयत्न केला. बोरकर यांनी प्रतिकार केल्यामुळे त्यांच्यावर चाकूने हात व पाठीवर वार करण्यात आले. संशयित आरोपी घटनास्थळावरून पळून गेले. घटनेनंतर कोतवाली पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
गुन्हे शाखेच्या पथकाने गोपनीय माहिती आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे तपास सुरू केला. यात प्रविण राजू चांदणे (वय 19) आणि राहुल राजू भोसले (वय 20, दोघेही रा. सिद्धार्थनगर, नगर) यांना अटक करण्यात आली. हे दोघेही मोपेडवर असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी त्यांना सिद्धार्थनगर येथे सापडल्यावर ताब्यात घेतले. तिसरा संशयित आरोपी गणेश विजय लोमटे (रा. प्रेमदान हाडको, नगर) पसार असून त्याचा शोध सुरू आहे.