नाशिक । प्रतिनिधी Nashik
महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 साठी 20 नोव्हेंबर म्हणजेच उद्या मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. त्या अनुषंगाने .भारत निवडणूक आयोगाने मतदानाच्या दिवशी मतदारांच्या मतदानाची गोपनियता राखण्याच्या दृष्टीने मतदान केंद्रात मोबाईल फोन, सॅटेलाईट फोन तसेच वायरलेस सेट आदी नेण्यास प्रतिबंध केला असल्याची सूचना जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी जलज शर्मा यांनी दिली आहे.
मोबाईल किंवा अन्य साधनांचा वापर करून मतदारांवर धाक दपटशा, दडपशाही केली जाऊ नये यासाठीही मतदान केंद्रात मोबाईल वापरास बंदी सक्त मनाई केली आहे. आयोगाच्या निर्देशानुसार दर दोन तासांनी मतदानाची आकडेवारी, मतदान यंत्रात बिघाड इत्यादी तातडीच्या कामकाजासाठी संबंधित मतदान केंद्राध्यक्ष, क्षेत्रीय अधिकारी यांना केवळ मोबाईल वापर अनुज्ञेय आहे.
मतदानासाठी लागणारे ओळखपत्र सोबत बाळगणे महत्वाचे आहे. त्यासाठी मोबाइल चा आग्रह करू नये. या व्यतिरिक्त कोणताही व्यक्ती मतदान केंद्रात मोबाईल नेऊन त्याचा वापर करतांना आढळल्यास लोकप्रतिनिधीत्व अधिनियम 1951 व भारतीय न्याय संहितेनुसार कारवाई करण्यात येईल, असेही जिल्हा निवडणूक अधिकारी जलज शर्मा यांनी आदेशित केले आहे. मतदारांनी वरील सूचनांचे पालन करून मतदान करावे, असे आवाहनही जलज शर्मा यांनी केले आहे.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा