नाशिकरोड । प्रतिनिधी Nashikroad
गेल्या काही दिवसापासून चर्चेत असलेल्या नाशिकरोड येथील टोइंग बाबत विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांनी विरोध केल्यानंतर आता पुन्हा युवान प्रतिष्ठान व नाशिक रोड ब्लॉक काँग्रेसने विरोध केला असून या संदर्भात त्यांनी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांची भेट घेऊन निवेदन सादर केले व चर्चा केली त्यानंतर पोलीस आयुक्त कर्णिक यांनी नाशिक रोड येथील वाहने टोइंगला स्थगिती देण्याचे आश्वासन दिल्याने नाशिक रोड मधील नागरिकांमध्ये व वाहनधारकांमध्ये समाधान व्यक्त केले जात आहे.
नाशिक रोड परिसरात गेल्या पाच मार्चला टोइंग सुरू होणार होती. परंतु त्याअगोदरच शिवसेना ठाकरे पक्ष, बहुजन रयत परिषद व शहर काँग्रेसने त्यास विरोध केला होता. परिणामी त्यामुळे नाशिकरोड परिसरात टोइंग सुरू करण्यात आली नाही. दरम्यान पोलीस आयुक्त संदीप कर्णिक हे काल नाशिकरोड येथे आले असता त्यांची युवान प्रतिष्ठानचे श्याम गोहाड प्रशांत बारगळ ब्लॉक युवा काँग्रेसचे अध्यक्ष दिनेश निकाळे यांनी नाशिकरोड पोलीस ठाण्यात भेट घेतली. त्यांच्याशी टोइंग बाबत चर्चा करून निवेदन सादर केले.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा
टोइंग अन्यायकारक असून ती नाशिक रोडला सुरू करण्यात येऊ नये, सात वर्षापूर्वी अशीच टोईंग सुरू असताना वाद निर्माण झाले होते. त्यामुळे सामान्य नागरिक हैराण झाले होते. टोइंग कर्मचार्यांच्या दादागिरीमुळे वाहन चालक त्रस्त झाले होते. ही मोहीम अन्यायकारक असून ती नाशिकरोडला सुरू करू नये, अशी मागणी करण्यात आली.
पोलीस आयुक्तांनी शिष्टमंडळाला टोइंगला स्थगिती देण्यात येईल असे आश्वासन दिले. याप्रसंगी सहाय्यक पोलीस आयुक्त डॉ.सचिन बारी, वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक गिरी उपस्थित होते, असे शाम गोहाड, दिनेश निकाळे, प्रशांत बारगळ यांनी सांगितले. नाशिकरोड परिसरातील नागरिकांनी पोलिसांच्या निर्णयाचे स्वागत केले आहे.