Friday, November 22, 2024
Homeनगरनिवडणुकीत दिलेली आश्वासने पुणतांबेकरांसाठी ठरला गाजराचा हलवा

निवडणुकीत दिलेली आश्वासने पुणतांबेकरांसाठी ठरला गाजराचा हलवा

पुणतांबा | Puntamba

पुणतांबा गावची निवडणूक होऊन जवळपास 6 महिने पूर्ण होत आहे. निवडणूक काळात ग्रामस्थांना दिलेल्या आश्वासनांची पूर्ती करणे गरजेचे आहे. गावात तीव्र पाणीटंचाई असताना ती दूर करण्यासाठी ठोस कृती करण्याची गरज होती. तसेच वाड्यावस्त्यावर पाणी पुरवठा योजनेच्या पाईपलाईनची कामे पावसाळ्यापूर्वी पूर्ण होणे गरजेचे होते. दिवाबत्ती, पाणीपुरवठा, आरोग्य स्वच्छता या मुलभूत सेवेत बदल करण्याची गरज आहे. यासह इतरही आश्वासने ग्रामपंचायत निवडणुकीत दिली होती. ती पुणतांबेकरांसाठी ‘गाजराचा हलवा’ ठरतात की काय अशी चर्चा सध्या ग्रामस्थांमध्ये सुुरु आहे.

- Advertisement -

राहाता तालुक्यातील ग्रामीण भागातील सर्वात मोठी ग्रामपंचायत म्हणून पुणतांबा-रास्तापूर ग्रुप ग्रामपंचायतीचा आर्वजून उल्लेख केला जातो. राज्यात शेतकरी संपाचे गाव म्हणून या गावाची 1 जून 2017 पासून विशेष ओळख निर्माण झालेली आहे. राजकीयदृष्ट्या हे गाव अत्यंत संवेदनशील समजले जाते. सर्व प्रकारच्या निवडणुका पुणतांबा गावात अत्यंत अटीतटीने लढविल्या जातात. ग्रामपंचायत निवडणूक ग्रामस्थांच्या दृष्टीने अत्यंत जिव्हाळ्याचा व आवडीचा विषय आहे. 5 नोव्हेंबर 2023 मध्ये 17 जागासाठी या ग्रामपंचायतीची निवडणूक झाली. या निवडणुकीत ना. राधाकृष्ण विखे पाटील यांचे जनसेवा पॅनल, युवा नेते विवेक कोल्हे व शेतकरी सेनेचे प्रदेशाध्यक्ष धनजंय जाधव यांची पुणतांबा विकास आघाडी, आ. आशुतोष काळे यांच्या मार्गदर्शनाखाली लोकसेवा मंडळ निवडणूक रिंगणात होते. तीनही पॅनलचे नेतृत्व येथील स्थानिक नेत्यांनी केले होते.

विशेष म्हणजे निवडणुकीत पॅनेल प्रमुखांनी दिलेली आश्वासने व जाहिरनामा पुणतांबा येथील सुज्ञ नागरिकांना विसरणे शक्य होत नाही. आश्वासनाची पूर्ती कधी होणार याकडे ग्रामस्थांचे लक्ष लागून आहे. तीनही पॅनेलच्या प्रमुखांनी वारेमाप आश्वासने दिली होती. तेवढी आश्वासने पूर्ण झाली तर पुणतांबा गाव हिवरे बाजारापेक्षाही आदर्श गाव होऊ शकते. भ्रष्टाचार युक्त पाणीपुरवठा योजनेची चौकशी करून वाड्यावस्त्यावर पाणी पोहचविणे, नवीन नळ जोडणीसाठी अनामत म्हणून घेतलेले 1500 रुपये परत करणे, पुणतांबा रेल्वे स्थानकावर जलद व पॅसेंजर गाड्यांना थांबा मिळविणे, गावात पर्यायी उद्योग सुरु करणे, बंदिस्त गटारीचे काम पूर्ण करणे, विद्यार्थ्यांना स्पर्धा परिक्षेची तयारी करण्यासाठी स्वतंत्र अभ्यासिका सुरु करणे, भव्य व्यापारी संकुल उभारणे, खेळासाठी स्वंतत्र क्रिडांगण तयार करणे, गाव दहशत व भयमुक्त करणे, ग्रामपंचायत कर्मचार्‍यांचे वेळेवर पगार करणे, शासकीय अधिकार्‍यांचे पुणतांब्यातच वास्तव राहण्यासाठी त्यांच्या निवासाची व्यवस्था करणे, गावात अद्ययावत व भव्य बस स्थानकासाठी निधी मिळविणे, सर्व रस्त्यांचे कॉक्रिटीकरण करणे यासह अनेक आश्वासने तिनही पॅनेल प्रमुखांनी दिले होते.

ग्रामपंचायत निवडणुकीत तात्कालिक परिस्थितीत सत्तारूढ जनसेवा पॅनेलला 17 पैकी 4 जागा, लोकसेवा पॅनेलला 4 जागा तर विवेक कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली असलेल्या पुणतांबा विकास आघाडीने सरपंचपदासह 9 जागा जिंकून ग्रामपंचायतीची सत्ता हस्तगत केली. सरपंचपदी स्वाती पवार व उपसरपंचपदी निकिता धनंजय जाधव या दोन्ही महिलांची वर्णी लागली. ग्रामपंचायतीत ‘महिला राज’ सुरु झाले. पुणतांबा-रास्तापूर ग्रामपंचायत कोल्हे गटाच्या ताब्यात आली. निवडणूक काळात या गटाने ग्रामस्थांना दिलेली आश्वासने टप्याटप्याने पूर्ण करण्याची जबाबदारी या गटाच्या प्रमुखांवर आलेली आहे. निवडणूक होऊन जवळपास 6 महिने पूर्ण होण्याच्या मार्गावर आहेत. या काळात विवेक कोल्हे यांनी पुणतांबा ग्रामस्थांना दिलेल्या आश्वासनांची पूर्ती करणे गरजेचे आहे.

गावात तीव्र पाणीटंचाई असताना ती दूर करण्यासाठी ठोस कृती करण्याची गरज होती. तसेच वाड्यावस्त्यावर पाणी पुरवठा योजनेच्या पाईपलाईनची कामे पावसाळ्यापूर्वी पूर्ण होणे गरजेचे होते. जलजीवन मिशन योजनेचे काम ठेकेदार प्रलंबित ठेवत असेल तर पर्यायी व्यवस्था करण्याची गरज आहे. दिवाबत्ती, पाणीपुरवठा, आरोग्य स्वच्छता या मुलभूत सेवेत आमुलाग्र बदल करण्याची गरज असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. इतरही आश्वासनासाठी पाठपुरावा करण्याची गरज आहे.
पुणतांबा ग्रामस्थांच्या अडचणी समजून घेण्यासाठी विवेक कोल्हे यांनी दर 3 ते 4 महिन्याच्या अंतराने पुणतांबा येथे जनता बाजार घेण्याची गरज आहे. तसे न झाल्यास ग्रामस्थांची नाराजी निर्माण होऊन आगामी पंचायत समिती, जिल्हा परिषद, विधानसभा निवडणूक, शिक्षक मतदार संघातील निवडणूक यासह अनेक निवडणुकीवर प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष परिणाम होण्याची शक्यता आहे. नाहीतर निवडणुकीत मतदारांना दिलेली आश्वासने ‘गाजराचा हलवा’ ठरण्याची शक्यता आहे.
ग्रामपंचायत निवडणुकीत विरोधी गटाकडे 8 सदस्यांचे संख्याबळ आहे.

उपसरपंच निवडणुकीत विरोधी गटाकडून जोरदार मोर्चेबांधणी सुरु करण्यात आली होती. मात्र हायकंमाडने ‘सबुरीचा सल्ला’ दिला होता. त्यांना काही दिवस काम करू द्या, नंतर बघू असे स्पष्ट केले. असे असले तरी ग्रामपंचायतीचा सध्याचा कारभार पाहता विरोधी गट किती दिवस बघ्याची भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. त्यामुळे यापुढील काळ ग्रामपंचायतीचे सत्ताधारी किती आश्वासने कधी पूर्ण करणार यावरच पुढील राजकीय समीकरणे अवलंबून आहे. लोकसभा निवडणुकीच्या वेळी महायुतीच्या उमेदवाराला विजयी करण्यासाठी पुणतांब्यातील ना. विखे गट, आ. आशुतोष काळे गट व माजी आ. स्नेहलता कोल्हे गट एकत्र आले होते. गावाच्या सत्तेसाठी नव्हे तर विकासासाठी तीनही गट भविष्यात एकत्र येऊन काम करणार असेल तर पुणतांबेकरांना वैभवाचे दिवस प्राप्त होण्याची शक्यता आहे.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या