अहिल्यानगर |शेवगाव |प्रतिनिधी| Ahilyanagar, Shevgav
शेवगावच्या शिवनगर भागात सुरू असलेल्या कुंटणखान्यावर (वेश्या व्यवसाय) विशेष पोलीस पथकाने छापा टाकून तब्बल 17 पीडित महिलांची सुटका केली. या कारवाईत एकाला अटक करण्यात आली असून एक महिला पसार झाली आहे. ही धडक कारवाई पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्या सूचनेनुसार करण्यात आली.
अधीक्षक घार्गे यांनी जिल्ह्यातील अवैध व्यवसायांवर कठोर कारवाईचे आदेश दिले असून त्या अनुषंगाने पथकाने कारवाई केली. मंगळवारी (17 जून) रात्री 9 वाजण्याच्या सुमारास शेवगाव शहरातील शिवनगर भागात शबाना सय्यद पठाण व गणेश लक्ष्मण शिंदे या दोघांकडून कुंटणखाना चालवला जात असल्याची माहिती पथकाला मिळाली. त्यानुसार बनावट ग्राहकाच्या माध्यमातून खात्री करून पोलिसांनी अचानक धाड टाकली.
घटनास्थळी गणेश लक्ष्मण शिंदे हा मिळून आला असून शबाना पठाण ही महिला पसार झाली आहे. छाप्यावेळी पोलिसांनी तीन खोल्यांची तपासणी केली असता दोन खोल्यांमध्ये प्रत्येकी एक पुरूष व एक महिला आढळून आले. तिसर्या खोलीत एकूण 15 महिला वैश्या व्यवसायासाठी ठेवलेल्याचे उघड झाले. महिलांनी दिलेल्या माहितीनुसार संशयित आरोपींनी त्यांना जास्त पैसे मिळतात असे सांगून फसवून बोलावले होते व पुरूषांकडून पैसे घेऊन त्यांच्याकडून जबरदस्तीने वेश्याव्यवसाय करून घेतला जात होता. या कारवाईत पोलिसांनी एकूण 17 महिलांची सुटका केली असून गणेश शिंदे, पसार शबाना पठाण आणि दोन ग्राहक यांच्याविरोधात शेवगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मावा तयार करणार्यांवर कारवाई
पोलीस पथकाने शेवगाव शहरात अवैध सुगंधीत तंबाखू विक्री व मावा तयार करणार्यांवर कारवाई करत सुमारे चार लाख रूपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी पाच जणांविरूध्द शेवगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. खलील नबिब शहा, अल्ताफ पठाण (दोघे रा. नाईकवाडी मोहल्ला, शेवगाव), कुणाल संजय पिसाळ (रा. भगतसिंग चौक, शेवगाव), शहाबाज ताहेर खान पठाण, आफताब ताहेर खान पठाण (दोघे रा. बंधन लॉन्स, शेवगाव) अशी गुन्हा दाखल झालेल्या संशयितांची नावे आहेत. पोलिसांनी त्यांच्याकडून सुगंधीत तंबाखू, मावा तयार करण्यासाठी वापरण्यात येणार्या कच्च्या-पक्क्या सुपार्या, मशीनरी व गिरण्या असा मुद्देमाल हस्तगत केला.




