Saturday, May 18, 2024
Homeनगरपुलाचे संरक्षक कठडे बनले धोकादायक

पुलाचे संरक्षक कठडे बनले धोकादायक

दाढ बुद्रुक |वार्ताहर| Dadh Budruk

राहाता तालुक्यातील प्रति पंढरपूर म्हणून ओळखल्या जाणार्‍या दाढ बुद्रुक येथील श्री संत मुकुंददास महाराज मंदिराजवळील प्रवरा नदीवरील पुलाचे काही ठिकाणचे संरक्षक कठडे गायब झाल्याने या पुलावरून येणार्‍या जाणार्‍या नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. सदर बाबीकडे सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष असल्याने दाढ बुद्रुक येथील प्रवरा नदीवरील पुलावर लहान-मोठ्या अपघातांना निमंत्रण मिळत आहे.

- Advertisement -

पुलाला लोखंडी पाईप बसवलेले संरक्षक कठडे अनेक ठिकाणचे गायब झाल्यामुळे या पुलावरून जीव मुठीत ठेवून मार्गक्रमण करावे लागते. या पुलावरून खाली नदीपात्रात काही नागरिक पडल्याच्या घटना सुद्धा यापूर्वी घडल्या आहेत. दुर्दैवाने त्यामध्ये काही जणांचा बळीही गेला आहे. नदीचे पात्र खोल असल्याने व बंधार्‍यामुळे नदीला कायम पाणी साचत असल्याने भविष्यात मोठी घटना होण्याची शक्यता नाकारता येत नाही. प्रवरा नदी तीरावर महादेव मंदिर, श्री संत तुकाराम महाराज मंदिर, श्री संत मुकुंददास महाराज मंदिर असल्याने या ठिकाणी कायम भाविक भक्तांची उत्सवामुळे व विविध प्रकारच्या धार्मिक कार्यक्रमामुळे वर्दळ सरु असते.

नदीला कायम पाणी साचत असल्याने धार्मिक कार्यक्रमावेळी नदीच्या पुलावरच भाविकांसाठी सुविधा निर्माण केली जाते. मुळात पुलाच्या संरक्षक कठड्यांची रचनाच चुकीची आहे. पुलावरील छोटे काँक्रिटचे ब्लॉक यातील अंतर सुद्धा जास्त ठेवले गेले आहे. पुलावरून पायी चालताना देखील असुरक्षित वाटते. लोखंडी पाईपऐवजी सिमेंट काँक्रिटचे कठडे जास्त सुरक्षित आहेत हे का सार्वजनिक बांधकाम विभागाला कळत नाही, असा प्रश्न उपस्थित होत आहे. रोज पहाटे, सकाळी व सायंकाळी या पुलावरून मॉर्निंग वॉकसाठी लोक फिरत असतात.

त्यामुळे दाढ बुद्रुक येथील प्रवरा नदीवरील सुरक्षा कठड्यांची दुरुस्ती करण्यात यावी. तसेच या पुलावरून अवागमन सुरक्षित होईल म्हणून उपाययोजना करण्यात याव्यात, अशी मागणी या पुलावरून ये-जा करणार्‍या जागरूक नागरिकांकडून होत आहे. याकडे सार्वजनिक बांधकाम विभागाने तात्काळ लक्ष द्यावे अन्यथा पुलावर मोठा अपघात होईल याला जबाबदार कोण राहणार ,असा प्रश्न देखील उपस्थित केला जात आहे.

दाढ बुुुद्रुक येथील प्रवरा नदीवरील पूल हा संगमनेर तालुक्यातील दाढ खुर्द, चणेगाव, खळी, पिंप्री व इतर गावांना जोडलेला आहे. रात्री उशिरापर्यंत या पुलावरून नोकरी व कामामुळे ये जा सुरू असते म्हणून ज्या ज्या ठिकाणचे संरक्षक कठडे गायब झाले आहेत तेथे त्वरित लोखंडी पाईप वेल्डिंग करून प्राधान्याने बसवण्याची सजगता बांधकाम विभागाने दाखवावी, असा सूर मार्गक्रमण करणारे नागरिक तसेच ग्रामस्थांमध्ये उमटला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या