नवी दिल्ली वृत्तसंस्था | New Delhi
बांगलादेशात सरकारी नोकऱ्यांमधील आरक्षणावरुन आठवडाभरापासून सुरू असलेले आंदोलन आता उग्र बनले आहे. गुरुवारी संध्याकाळी आंदोलकांनी बांगलादेशच्या मुख्य सरकारी टीव्ही चॅनल बीटीव्हीच्या मुख्यालयाला आग लावली. तर या आरक्षणाच्या विरोधात झालेल्या हिंसाचारात आत्तापर्यंत ३९ जणांचा मृत्यू झाला आहे. तर २५०० पेक्षा जास्त जण जखमी झाले आहे. आंदोलकांनी बसेस सोबत खासगी वाहनांची देखील जाळपोळ केली आहे.
एएफपीच्याने दिलेल्या वृत्तानुसार, गुरुवारी सायंकाळी शेकडो आंदोलकांनी बीटीव्ही कार्यालयाच्या कॅम्पसमध्ये प्रवेश केला आणि ६० हून अधिक वाहने जाळली. पंतप्रधान शेख हसीना यांनी बीटीव्हीला मुलाखत दिली होती. गुरुवारीही विद्यार्थी आणि पोलिसांमध्ये हिंसक चकमक झाली. पीटीआयच्या वृत्तानुसार, गुरुवारी झालेल्या हिंसाचारात किमान १८ जणांचा मृत्यू झाला होता.
बांगलादेशमध्ये हिंसाचारामुळे बस, ट्रेन आणि मेट्रोची सेवा पुर्ण ठप्प झाली आहे. हिंसाचारामुळे बांग्लादेशमध्ये इंटरनेट सेवा बंद केली आहे. यासह, कॉलेज, प्राथनास्थळे बंद करण्यात आली आहे. पूर्ण देशभरात हिंसाचार नियंत्रणात आणण्याासाठी मोठ्या प्रमाणात सैनिकांना रस्त्यावर उतरवण्यात आले आहे.
दरम्यान, बांगलादेशमध्ये सुरू असलेल्या हिंसाचारानंतर तेथून भारतीय लोकांचे स्थलांतर सुरू झाले आहे. पीटीआयच्या वृत्तानुसार, अधिकाऱ्यांनी गुरुवारी सांगितले की, हिंसाचारानंतर तेथे अडकलेले ३०० हून अधिक भारतीय, नेपाळी आणि भूतानी नागरिक मेघालयात पोहोचले आहेत. त्यापैकी बहुतांश विद्यार्थी आहेत. आसाम सरकारने सांगितले की ते शेजारील देशात राहणाऱ्या लोकांच्या सुरक्षिततेची खात्री करण्यासाठी परराष्ट्र मंत्रालयाच्या संपर्कात आहे.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा