मालेगाव प्रतिनिधी
विकृत मानसिकतेचा बळी ठरलेल्या डोंगराळे येथील साडेतीन वर्षीय बालिकेच्या निघृण हत्येच्या निषेधार्थ व हे कृत्य करणाऱ्या नराधमास फाशीची शिक्षा व्हावी या मागणीसाठी शहरासह तालुक्यातील विविध शैक्षणिक, सामाजिक, राजकीय संघटनांकडून या घृणास्पद घटनेचा निषेध करण्यासाठी आज मालेगावमध्ये कडकडीत बंद पाळण्यात आला. या बंदला मालेगावकरांनी उदंड प्रतिसाद ही दिला. या बंददरम्यान मोर्चेकऱ्यांकडून आरोपीला लवकरात लवकर फाशीची शिक्षा देण्यात यावी अशी मागणी करण्यात आली. पण या जन आक्रोशमोर्चाला आंदोलकांकडून हिंसक वळण लागले. मोर्चेकर्ऱ्यांनी यावेळी मालेगाव न्यायालय परिसरात घुसण्याचा प्रयत्न केला.
या प्रकरणातील आरोपीला आज कोर्टात हजर करण्यात येणार होते, मात्र प्रचंड जनक्षोभ, लोकांचा संतापामुळे मालेगाव शहरातील वातावरण तापले आहे. या घटनेचा निषेध काढण्यासाठी काढण्यात आलेल्या मोर्चाला गालबोट लागले आहे. चिमुकल्या मुलीवर आत्याचार करणाऱ्या आरोपीला आमच्या ताब्यात द्या, त्याला जाहीर फाशी द्या अशीच प्रत्येकाची मागणी असून मालेगाव कोर्टाच्या आवारात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली आहे.
हे ही वाचा: Malegaon News: बालिका हत्येच्या निषेधार्थ मालेगावात आज कडकडीत बंद; महिलांचा मोर्चात लक्षणीय सहभाग
चिमुकलीचा बदला फाशीच अशा घोषणा यावेळी संतप्त आंदोलकांकडून देण्यात आल्या असून या घटनेचा तीव्र निषेध करण्यात आला. हा मोर्चा संपल्यानंतर परिसरात जमलेला जमाव अचानक आक्रमक झाला. ज्यानंतर या जमावाने मालेगाव न्यायालय परिसरात शिरकाव करत न्यायालायच्या आतमध्ये प्रवेश करण्याचा प्रयत्न केला. यावेळी संतप्त जमावाकडून न्यायालयाचे गेट तोडण्याचा प्रयत्न झाला.
दरम्यान, यावेळी पोलीसांनी तात्काळ कारवाई करत जमावाला न्यायालय परिसरातून बाहेर काढले. मात्र तरीही लोकांचा संताप कायम असून हातात निषेधाचे फलक घेऊन, जोरदार घोषणाबाजी करत आंदोलकांनी न्यायाची मागणी केली आहे. निष्पाप मुलीच्या हत्येनंतर संपूर्ण मालेगावमध्ये दु:खाचे आणि संतापाचे वातावरण असून मुलीला न्याय द्या, आरोपीला फासावर चढवा, तोपर्यंत आमच्या मनाला शांति मिळणार नाही, असाच गावकऱ्यांचा आक्रोश पहायला मिळत आहे.




