Wednesday, May 29, 2024
Homeनाशिकदफनभूमीसाठी वाढीव जागा द्यावी

दफनभूमीसाठी वाढीव जागा द्यावी

नवीन नाशिक । New Nashik (प्रतिनिधी)

मोरवाडी येथे अमरधामशेजारी असलेली दफनभूमीची जागा वाढवून देण्यात यावी यासाठी मोरवाडी ग्रामस्थांच्या वतीने महापौर सतीश कुलकर्णी यांना निवेदन देण्यात आले. मोरवाडी अमरधामचा विकास करतानाच या ठिकाणी दफनभूमीसाठी जागा वाढवून देण्याचे आश्वासन देण्यात आले होते.

- Advertisement -

मात्र त्यावर कोणताही निर्णय न झाल्याने आता ग्रामस्थांनी यासाठी पुढाकार घेतला असल्याचे सांगण्यात आले आहे.

शहरात सिडको प्रशासनाने योजना उभारताना सर्वाधिक जागा मोरवाडी गावातील नागरिकांच्या घेतल्या आहेत. सिडको प्रशासनाने 38 वर्षांपूर्वी या जागा संपादित करून सिडको परिसराचा विकास साधला. सिडकोचा विकास झाला असला तरी अजूनही मोरवाडी हे पूर्वीसारखे गावच आहे. या गावात 90 टक्के लोक तसेच सिडकोचे नवीन नाशिक झालेल्या परिसरातही अनेक रहिवासी हे महानुभावपंथीय आहेत.

महानुभव पंथातील व्यक्तीचा मृत्यू झाल्यावर त्याला दफन करण्यासाठी मोरवाडी गावच्या स्मशानभूमीच्या लगतची जागा वापरण्यात येते. कालांतराने सिडको वसाहत म्हणजेच नवीन नाशिकची लोकसंख्या वाढली. त्यामुळे ही जागा आता खूप कमी आहे. मागील चार वर्षांत मोरवाडी अमरधामचे बांधकाम करण्यात आले.

उरलेल्या भागात काँक्रिटीकरण करण्यात आल्यामुळे ही जागा खूपच कमी असल्याने व नवीन नाशिक परिसरातील लोकसंख्या खूप मोठी असल्याने या सर्व परिसरातील लहान मुलांचेही दफनविधी याच ठिकाणी केले जातात. या ठिकाणी जागा नसल्याने खूपच अडचण होते.

या दफनभूमीच्या मागील बाजूस किंवा लगत असलेल्या जागेतच ही जागा वाढवून देण्यात यावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली. दफनविधीचा प्रश्न खूपच अडचणीचा तसेच गंभीर बनू शकतो. या परिस्थितीचा विचार करून चार एकर जागा मनपा प्रशासनाने दफनविधीसाठी वाढवून द्यावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली.

याबाबत आ. सीमा हिरे यांच्याशी चर्चा करण्यात आल्याचे ग्रामस्थांनी महापौरांना सांगितले. यावेळी सभागृह नेते सतीश सोनवणे, गटनेते जगदीश पाटील, भाजप मंडलाध्यक्ष शिवाजी बरके, भिकाजी सोनवणे, कैलास उंबरे, सुरेश डोळसे, दत्तू तडाखे, भगवान गामणे, संजय घुगे आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या