पुणे । Pune
आलीशान पोर्श कार बेदरकारपणे हाकत अल्पवयीन आरोपीने तरुण आणि तरुणीला चिरडल्याच्या (Pune Porsche Accident) घटनेने पुणे शहर आगोदरच हादरले आहे. या प्रकरणामुळे समाजात निर्माण झालेला संताप कायम असतानाच पुन्हा एकदा अशाच प्रकारची घटना घडली आहे.
पुण्यातील खेडचे राष्ट्रवादीचे (NCP) आमदार दिलीप मोहिते पाटील (Dilip Mohite Patil) यांच्या पुतण्याने कारखाली दोघांना चिरडल्याची घटना घडली. यात एकाचा जागीच मृत्यू झाला असून दुसरा गंभीर जखमी झाला आहेत. ओम सुनिल भालेराव या 19 वर्षीय तरुणाचा अपघातात मृत्यू झाला आहे. पुणे-नाशिक महामार्गावरील एकलहरेजवळ शनिवारी रात्रीच्या सुमारास ही घटना घडली आहे. या अपघातामुळे खळबळ उडाली आहे. (Pune Accident)
हे देखील वाचा : “महायुतीत अजितदादांचं खच्चीकरण, त्यांनी आंबेडकरांसोबत…”; NCP नेत्याचं खळबळजनक विधान
या अपघातानंतर स्थानिकांनी लागलीच या घटनेची माहिती पोलिसांना दिली. त्यानंतर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत या अपघाताची पाहणी केली. ज्यानंतर या प्रकरणात आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्या पुतण्यावर गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. मयूर मोहिते असे आमदार दिलीप मोहिते पाटलांच्या पुतण्याचे नाव असून या अपघातावेळी आरोपी मयूर हा मद्यधुंद अवस्थेत होता की नाही, याचा पोलिसांकडून तपास करण्यात येत आहे.
दरम्यान आमदार दिलीप मोहिते पाटलांनी एका वृत्त वाहिनीशी बोलताना या अपघातांवर प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, अपघातानंतर माझा पुतण्या मयूर साहेबराव मोहिते हा कुठं ही पळून गेला नाही. शिवाय त्यानं मद्यपानही केलेलं नव्हतं. माझा पुतण्या नारायणगाव मार्गे कळंबवरुन खेडकडे येत होता. अपघात का झाला? कुठे झाला? त्यावेळी अंधार होता, त्यामुळे कसा झाला? याबाबत कुणालाच काहीच कल्पना नाही.
हे देखील वाचा : पावसाच्या खंडामुळे धाकधूक वाढली; खरीप हंगामाच्या किती हेक्टरवर पेरण्या पूर्ण?
याप्रकरणी पोलीस तपास करत आहेत. पोलीस सगळ्या प्रकारची चौकशी करत आहेत. झालेली गोष्ट १०० टक्के चुकीची आहे. मी मृत तरुणाच्या कुटुंबाच्या दुःखात सहभागी आहे. मी वातावरण शांत झालं की, स्वतः कुटुंबाची भेट घेणार आहे. मी कोणत्याही चुकीच्या गोष्टीचं समर्थन करत नाही, करणार नाही. असंही ते म्हणाले.