Tuesday, January 27, 2026
Homeक्राईमCrime News : लग्नात ५० तोळे सोनं, गाडी घेण्यासाठी २५ लाख रोख,...

Crime News : लग्नात ५० तोळे सोनं, गाडी घेण्यासाठी २५ लाख रोख, तरीही सासरच्यांकडून छळ; अखेर विवाहितेने स्वत:ला संपवलं

गर्भपातही करावा लागला, पुण्यात वैष्णवी हगवणे प्रकरणाची पुनरावृत्ती

पुणे | Pune

पुणे जिल्ह्यातील (Pune District) उरुळी कांचन तालुक्यातील सोरतापवाडी येथे विवाहित महिलेने सासरच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे.दीप्ती मगर-चौधरी (Deepti Magar Chaudhary) असे आत्महत्या (Suicide) केलेल्या महिलेचे नाव असून, तिच्याकडे सासरच्यांनी अनेक मागण्या केल्या होत्या. या मागण्या तिने पूर्ण देखील केल्या. पंरतु, सासरच्या मंडळींकडून सातत्याने होणारा अपमान आणि घालून पाडून बोलण्याने दीप्तीने आत्महत्या केल्याचे बोलले जात आहे. यामुळे पुण्यात पुन्हा एकदा मागील वर्षी घडलेल्या वैष्णवी हगवणे प्रकरणाची पुनरावृत्ती झाल्याचे पाहायला मिळत आहे.

- Advertisement -

दीप्ती चौधरीचा विवाह २०१९ साली रोहन चौधरीसोबत (Rohan Chaudhary) झाला होता. यावेळी लग्नामध्ये तब्बल ५० तोळे सोने देण्यात आले होते. तसेच मुलीचा संसार चांगला व्हावा यासाठी तिच्या आईवडिलांनी दीप्तीच्या सासरच्या मंडळींना एकदा १० लाख रुपये रोख आणि गाडी घेण्यासाठी २५ लाख रुपये दिले होते. मात्र, तरीही तिला सासरच्या मंडळींकडून त्रास दिला जात होता. अखेर दीप्तीने रविवारी (दि.२५) रोजी आत्महत्येसारखे (Suicide) टोकाचे पाऊल उचलले.

YouTube video player

दरम्यान, याप्रकरणी दीप्तीच्या आईने (Mother) दिलेल्या फिर्यादीवरून उरुळी कांचन पोलिसांनी चार जणांवर गुन्हा दाखल केला आहे.यात पती रोहन चौधरी, सासू सुनीता चौधरी, सासरे कारभारी चौधरी आणि दीर रोहित चौधरी यांचा समावेश आहे. तर दोन जणांना अटक करण्यात आली असून, दोघे फरार आहेत. तर संशयित आरोपी सासू सुनिता चौधरी या ऑक्टोबर २०२५ मध्ये उरुळी कांचन जवळील सोरतापवाडीच्या सरपंच झाल्या होत्या.तर सासरे शिक्षक आहेत.

गर्भपातही करण्यात आला

दीप्तीच्या आईने दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी दाखल केलेल्या तक्रारीमध्ये तिचा (दीप्ती) गर्भपात केल्याचे समोर आले आहे. दीप्तीच्या मनाविरुद्ध जाऊन गर्भलिंग तपासणी करण्यात आली. यात तिच्या पोटातील बाळ हे मुलगी असल्याचे समजल्यावर पती रोहन, सासु सुनिता व सासरे कारभारी व दीर रोहित यांनी इच्छा नसताना जबरदस्तीने तिचा गर्भपात केला, तेव्हा मला धक्का बसला. परंतु, मी तिला आधार देत समजावून सांगितले व शांत केले, असं दीप्तीच्या आईने पोलीस तक्रारीत म्हटले आहे.

सरपंच सासूला मोठेपणा मिरवण्याची हौस

दीप्तीच्या सासू सुनीता चौधरी या ऑक्टोबर २०२५ मध्ये सरपंच झाल्या. निवडणुकीत मोठेपणा मिरवण्यासाठी आणि राजकीय महत्वाकांक्षेसाठी दीप्तीकडे पुन्हा पैशांची मागणी करण्यात आली. पैसे देण्यास नकार दिल्यावर पती, सासू, सासरे आणि दीर यांनी तिला मारहाण केली. तसेच, माहेरच्या रो-हाऊस स्कीममध्ये हिस्सा मागण्यासाठीही तिच्यावर दबाव टाकण्यात येत होता. अखेर या सततच्या छळाला आणि अपमानाला कंटाळून रविवार (दि.२५) रोजी रात्री दीप्तीने अवघ्या तीन वर्षांच्या चिमुकली समोर गळफास घेऊन आत्महत्या केली.

महिला आयोगाच्या अध्यक्षा काय म्हणाल्या?

सदर घटनेनंतर महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर (Rupali Chakankar) यांनी मयत दीप्तीच्या आई-वडीलांची भेट घेतली. यावेळी त्या म्हणाल्या, कुठल्याही महिलेला किंवा लेकीला त्रास झाला तर तिने तातडीने कळवायला हवे. आपण ठामपणे तिच्या पाठीशी उभे राहायला हवे. तुम्ही पोलिसांकडे तक्रार दाखल केली त्यासाठी अनेक पथके आहेत. सासरी नांदणाऱ्या लेकीला त्रास झाला तर तिच्यासाठी काय? तर तिच्यासाठी काही व्यासपीठ आहेत. वन स्टॉप सेंटर पासून अगदी तिचे आणि तिच्या कुटुंबियांचे काऊंसिलिंग करणे, तिला वकील देण्यापासून शेवटच्या क्षणापर्यंतची तिची लढाई लढण्यासाठी मोफत वकील असतात. हे सर्व गोपनीय ठेवलं जातं. अगदी आई-वडीलांशिवाय कोणालाही माहिती नसतं. ती वन स्टॉप सेंटरमध्येही जाऊन तक्रार करु शकते. आमची टीम वेगळ्या पद्धतीने काम करते. कायदा हा खूप कठोर आहे. कायद्याच्या चौकटीतून या सगळ्या प्रक्रिया होत राहतात. महाराष्ट्रातील कायदा हा भारतातील सर्वात सक्षम काम करतो. म्हणून तुम्हाला काही शंका असतील तर जरूर सांगा. या आधीचे दोन संशयित आरोपी पोलीस कोठडीत आहेत. त्यामुळे आपण आपल्या लेकींच्या पाठीमागे ठामपणे उभे राहण्याची शपथ घेऊ, असे त्यांनी म्हटले.

ताज्या बातम्या