Monday, November 25, 2024
Homeनगरपुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावर डिझेल चोरीचा धुमाकूळ

पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावर डिझेल चोरीचा धुमाकूळ

वाहनचालक झाले त्रस्त तर पोलिसांचे होतेय दुर्लक्ष

संगमनेर |तालुका प्रतिनिधी| Sangamner

तालुक्यातून जाणार्‍या पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील चंदनापुरी घाट ते कर्‍हे घाट दरम्यान महामार्गाच्या कडेला उभ्या असलेल्या मालवाहू वाहनांतून बिनधास्तपणे डिझेल चोरीचा धक्कादायक प्रकार सुरू आहे. तलवारींचा धाक दाखवून ही चोरी होत असल्याने तक्रार करण्यासही कोणी धजावत नाही. मात्र, पोलिसांचे दुर्लक्ष होत असल्याने चोरट्यांचे चांगलेच फावत असल्याने वेळीच दखल घेऊन त्यांचा बंदोबस्त करण्याची गरज वाहनचालकांनी व्यक्त केली आहे. याबाबत मिळालेल्या माहितीवरुन, पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावरुन दैनंदिन हजारो वाहने धावतात. त्यात मालवाहू वाहनांची संख्या अधिक असते. दूरवरुन लाखो रुपयांचा माल भरुन इच्छित ठिकाणी नेण्याची मोठी जबाबदारी वाहनचालकांवर असते. त्यामुळे प्रवासात रात्रीच्या वेळी महामार्गाच्या कडेला जेवण आणि विश्रांतीसाठी थांबतात.

- Advertisement -

जेवण केल्यानंतर वाहनचालक आणि साथीदार झोपी जातात. त्यानंतर साधारण एक ते दीड वाजेनंतर डिझेल चोरणार्‍या टोळीचा कारनामा सुरू होतो. साधारपणे चार ते पाच जण दोन वाहनांतून येतात आणि थांबलेल्या वाहनांना लक्ष्य करतात.
वाहनचालक झोपी गेल्याची संधी साधून चोरटे क्षणार्धात डिझेल टाकीचे झाकण तोडून मोटारच्या साहाय्याने डिझेल काढून घेऊन पोबारा करतात. हा प्रकार सर्रासपणे चंदनापुरी घाट ते कर्‍हे घाट दरम्यान नित्यनेमाने घडत आहे. परंतू, डिझेल चोरी झाल्याचे सकाळी लक्षात आल्यानंतर वाहनचालकांना काय करावे हेच सूचत नाही. पोलीस ठाणे अंतरावर असल्याने गाडीसह माल सांभाळावा की तक्रार द्यायला जावे की मालकाला सांगावे अशी द्विधा मनःस्थिती तयार होते.

मालकाला सांगितले तर संशयाच्या हेतूने विचारपूस होते आणि पोलिसांत गेले तर तिथेही प्रश्नांची सरबत्ती होते. तेव्हा जावे कुठे आणि करावे काय या पेचात वाहनचालक पडतात. परिणामी, याकडे पोलिसांचे दुर्लक्ष होत असल्याने चोरट्यांचे चांगलेच फावत आहे. त्यामुळे पोलिसांनी गांभीर्याने याची दखल घेऊन रात्रीच्या वेळी गस्त वाढवून या चोरट्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी वाहनचालकांतून होत आहे.

चोरीचा ‘वेगळा’ कारनामा
दोन विना क्रमांकाच्या वाहनांतून येणार्‍या चोरट्यांकडे लाल आणि काळ्या रंगाच्या दोन कार आहेत. ते साधारण रात्री एक ते दीड वाजेच्या सुमारास येतात. चंदनापुरी घाट ते कर्‍हे घाटापर्यंत महामार्गाच्या कडेला उभ्या असलेल्या वाहनांतून डिझेल चोरल्यानंतर पोबारा करतात. ते टोलनाक्याला टाळून मधल्याच मार्गाने धूम ठोकतात. विशेष म्हणजे हिवरगाव पावसा टोलनाका परिसरात थांबणार्‍या वाहनांची संख्या अधिक असते, त्यामुळे चोरटे इथेच जास्त घुटमळतात. परंतु, कुठेही ते सीसीटीव्हीत दिसणार नाही याची खबरदारी घेतात. त्यामुळे पोलिसांनी चोरीचा हा कारनामा ओळखून बंदोबस्त करण्याची गरज आहे.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या