संगमनेर |तालुका प्रतिनिधी| Sangamner
तालुक्यातून जाणार्या पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील (Pune Nashik Highway) चंदनापुरी घाटात गुरुवारी (दि.16) दुपारी दोन वाजेच्या सुमारास संगमनेर आगाराची एसटी बस पलटी (Sangamner Depo ST Bus Accident) झाल्याची घटना घडली आहे. या अपघातात बसमधील अकरा प्रवासी किरकोळ जखमी (Injured) झाले आहेत. तर सुदैवाने मोठा अनर्थ टळला.
डोळासणे महामार्ग पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बस (क्र.एमएच 07, सी.9252) क्रमांकाची बस साकूरकडे (Sakur) जात असताना ही घटना घडली. बसचालक सर्जेराव रानबा मुंडे हे जवळपास 80 ते 85 प्रवाशांना घेऊन निघाले होते. चंदनापुरी घाटातून (Chandnapuri Ghat) साकूरकडे जाताना अचानक टेम्पो चालकाने कट मारल्याने बस चालकाचा ताबा सुटला. त्यामुळे बस महामार्गाच्या कडेला असलेल्या साईड गटारीत जाऊन पलटी झाली.
बस एका बाजूने कलंडल्यामुळे अनेक प्रवाशी एकमेकांवर आदळले आणि बसमध्ये गोंधळाची स्थिती निर्माण झाली. अपघाताची माहिती मिळताच आजूबाजूचे नागरिक व वाहनचालक मदतीस धावून आले. त्यांनी आत अडकलेल्या प्रवाशांना बाहेर काढण्यास मदत केली. घटनेची माहिती मिळताच तालुक्याचे पोलीस निरीक्षक प्रवीण साळुंखे, डोळासणे पोलीस मदत केंद्राचे सहायक पोलीस निरीक्षक रावसाहेब बांबळे, पोलीस उपनिरीक्षक राजू खेडकर त्यांच्या पथकाने तत्काळ धाव घेतली. क्रेनच्या साहाय्याने पलटी झालेली बस बाजूला करण्यात आली. यानंतर वाहतूक सुरळीत झाली. या अपघातात (Accident) जखमी झालेल्या प्रवाशांना तातडीने घाटातील रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले.
या अपघातात जिजाबाई बाळासाहेब ढेरंगे (25, रा. बिरेवाडी, ता. संगमनेर), बाबाजी दाजी कारंडे (60, रा. बिरेवाडी, ता. संगमनेर), अंजनाबाई रामनाथ पथवे (70, रा. कळस, ता. अकोले), ओम दत्तात्रेय उंडे (20, रा. पिंपळगाव देपा, ता. संगमनेर), सखुबाई भिमाजी बोराडे (75, रा. गुंजाळवाडी, ता. संगमनेर), कोंडाबाई किसन बिडगर (50, रा. साकूर, ता. संगमनेर), भीमराव रामभाऊ भालेराव (60, रा. रांजणगाव, जि. छत्रपती संभाजीनगर), मकरंद संतोष गंभीरे (9, रा. कोपरगाव), तनिष्का संतोष गंभीरे (13, रा. कोपरगाव), लताबाई गजानन वनवे (65, रा. हिवरगाव पठार, ता. संगमनेर), रोहिणी पांडुरंग मलगुंडे (20, रा. पिंपळगाव देपा, ता. संगमनेर) अशी जखमी प्रवाशांची नावे आहेत.




